Last Updated:
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माचं वनडे करिअर निर्णायक वळणावर पोहोचलं आहे. रविवार 19 जुलैला इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा सामना रोहित शर्माचा टीम इंडियाच्या जर्सीमधला शेवटचा सामना ठरू शकतो.
मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माचं वनडे करिअर निर्णायक वळणावर पोहोचलं आहे. रविवार 19 जुलैला इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा सामना रोहित शर्माचा टीम इंडियाच्या जर्सीमधला शेवटचा सामना ठरू शकतो. निवड समिती आता 2027 वनडे वर्ल्ड कप लक्षात घेऊन युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायच्या तयारीमध्ये आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर टीम मॅनेजमेंटच्या दीर्घकालीन योजनेसोबत सहमत आहेत. अजित आगरकर सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या रोडमॅपमध्ये रोहित शर्माचं नाव नसल्याचं सांगण्यात येत आहे. वनडे वर्ल्ड कपआधी यशस्वी जयस्वालला कमीत कमी 20 वनडे मॅच खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, असं निवड समितीला वाटत आहे.
‘कुणीही रोहित शर्माला निवृत्ती घ्यायला सांगणार नाही, पण वेस्ट इंडिजविरुद्ध सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भविष्यातील टीम तयार करण्याचं निवड समितीने निश्चित केलं आहे. याबाबत रोहित शर्माला सांगण्यात आलं आहे,त्यामुळे रोहित त्याच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेणार, हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे’, असं बीसीसीआयमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
रोहित शर्माचा फॉर्म ढासळला
रोहित शर्माची मागच्या काही काळातील वनडे क्रिकेटमधील कामगिरीही त्याच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मागच्या 8 वनडे सामन्यांमध्ये रोहितने 30.1 च्या सरासरीने आणि 88.60 च्या स्ट्राईक रेटने फक्त 241 रन केले, यात त्याला फक्त एकच अर्धशतक करता आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्येही रोहितची बॅट शांत राहिली. दुसऱ्या वनडेमध्ये रोहितने 47 बॉल खेळून फक्त 26 रन केले.
टी-20, टेस्टमधून आधीच रिटायरमेंट
रोहित शर्मा हा सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत रोहित 41 वर्षांचा होईल, त्यामुळे निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. रोहित शर्माने 29 जून 2024 ला भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर 7 मे 2025 ला रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधूनही रिटायर झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचली, तसंच 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफीही टीम इंडियाने जिंकली. यानंतर रोहितला कॅप्टन्सीवरून काढून शुभमन गिलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
रोहितचं करिअर
रोहित शर्माने 287 वनडे सामन्यांमध्ये 48.58 च्या सरासरीने 11,757 रन केले, ज्यात 33 शतकं आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 3 द्विशतकंही आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. 264 रन हा त्याचा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याशिवाय रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 159 सामन्यांमध्ये 31.34 च्या सरासरीने 4,231 रन केले, ज्यात 5 शतकं आणि 32 अर्धशतकं आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने 67 सामन्यांमध्ये 40.58 च्या सरासरीने 4,301 रन केले. रोहितच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 12 शतकं आणि 18 अर्धशतकं आहेत.
Mumbai,Maharashtra
Jul 17, 2026 12:54 AM IST
Rohit Sharma : ‘मुंबईचा राजा’ मैदान सोडणार, क्रिकेटच्या पंढरीत रोहितची रिटायरमेंट, वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चक्काचूर!
