मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या भेटीला आले आहेत. नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं सुरु आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलच्या अनेक चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत.
मागील पाऊण तासांपासून बैठक सुरु असल्याची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी बैठक सुरु आहे. मागील पाऊण तासांपासून बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता नंदनवन निवासस्थानी नेमकी काय चर्चा सुरु आहे, याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. दरम्यान, मागील दोनच दिवसांच्या आत जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जयंत पाटील यांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीसंदर्भात खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. माझा आणि प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या भेटीचा संबंध नाही. रात्री साडे दहा वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि पावणे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची 5 मिनिट चर्चा करून बाहेर पडल्याचे पाटील म्हणाले. तटकरे पटेल त्याठिकाणी असल्याची कोणतीही मला माहिती नव्हती अशी माहिती जयंत पाटील यांनी एबीपी माझाला दिली.
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले