Last Updated:
अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या तीनही आस्थापनांचे परवाने (Licenses) थेट निलंबित करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नामांकित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. मरीन लाइन्सची प्रसिद्ध पारसी डेअरी , गोवंडी येथील सुफी डेअरी आणि मुलुंडमधील ‘मेसर्स असोसिएशन या तीन मोठ्या ठिकाणांवर एफडीएने छापे (रेड्स) टाकले आहेत. अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या तीनही आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.
मुंबईतील अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या पारसी डेअरीच्या काळबादेवी येथील आस्थापनेवर FDA ने तपासणी केली. या ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आणि अनेक गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाल्याने, या डेअरीचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
डेअरीवर कारवाई करून परवाना निलंबित
गोवंडी येथील सुफी डेअरीमध्ये दुधाच्या साठवणुकीबाबत निष्काळजीपणा समोर आला आहे. अन्न व्यवसायिकाकडून स्टेनलेस स्टीलच्या मिल्क चिलिंग टँकमध्ये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या आणि कॅनमध्ये सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध बेकायदेशीरपणे साठवून त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. दुधाच्या दर्जावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकत असल्यामुळे या डेअरीवर कारवाई करून परवाना निलंबित करण्यात आला.
ग्राहकांची थेट फसवणूक आणि नियम धाब्यावर
मुलुंड येथील मेसर्स असोसिएशन या दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानात तर ग्राहकांची थेट फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर बॅच क्रमांक नमूद करण्यात आला नव्हता, तसेच लेबलिंगच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले होते.
बनावट पनीरचा संशय
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, येथे ग्राहकांना सुटे पनीर म्हणून विकला जाणारा पदार्थ प्रत्यक्षात ‘चीज ॲनालॉग’ असण्याची दाट शक्यता एफडीए अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे आणि लेबलिंगचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे या आस्थापनेचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुंबईतील दूध डेअरी चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या तीनही डेअरींना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे.
नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 18002223635 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
मुंबईतील 100 वर्ष जुन्या डेअरीवर तुकाराम मुंढेची कारवाई, जागेवर परवाने रद्द; लिस्ट समोर
