Twisha Sharma Death Case Hearing: लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात सासरी झालेल्या त्विशा शर्माच्या (Twisha Sharma) संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्विशा शर्मा प्रकरणात दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोपावर कोणतेही भाष्य केले नाही, मात्र या प्रकरणाचा तपास निपक्षपणे होईल याची खातरजमा आम्ही करू असे म्हटले आहे. त्विशा शर्माचा नवरा वकील असून तिची सासू माजी जिल्हा न्यायाधीश असल्याने या प्रकरणाभोवती संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. यावर कोर्टाने या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने होईल अशी खात्री दिली. (Supreme Court Hearing)
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मध्यप्रदेश सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडताना माध्यमांच्या हस्तक्षेपामुळे या तपासात मोठी प्रगती झाल्याचं सांगितलं. आपल्या मुलीचा मृत्यू पाहण्यापेक्षा तिनं घटस्फोटित असलेलं चांगलं असा धडा सर्व पालकांनी घ्यायला हवा असा युक्तिवाद त्यांनी केला.
सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं ?
आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात झालेल्या आरोपांवर न्यायालयाने अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही. सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी तपास यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. दोन्ही पक्षांना संबंधित न्यायालय व योग्य मंचावर आपले अधिकार आणि कायदेशीर पर्याय मांडण्याचा अधिकार आहे. त्याबाबत आम्ही कोणतेही मत व्यक्त केले नाही असं न्यायालयाने म्हटलं. तसेच राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आधीच घेतला असून सीबीआयने तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरन्यायाधीश कृष्णदास राजगोपाल म्हणाले.
मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेश देताना नमूद केलं ‘ या प्रकरणाच्या तपासावर परिस्थितीजन्य पक्षपात झाल्याचे आरोप विविध अहवालांमध्ये करण्यात आले होते.या कथेत पक्षपातामागे मृत महिलेचा पती हा व्यवसायाने वकील असून सासू माजी जिल्हा न्यायाधीश असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. पीडित कुटुंबीयांनी तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचेही आरोप केले होते. न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्यामुळे निष्पक्ष तपास होत नसल्याचे वातावरण निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतल्याचे ही आदेशात म्हटले आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने 22 मे रोजी मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावं आणि तपास प्रक्रियेवरील दोन्ही पक्षांचा विश्वास वाढवा यासाठी दुसऱ्या शवविच्छेदनाच्या आदेश दिल्याची बाबही सर्वोच्च न्यायालयाने लक्षात आणून दिली.
Twisha Sharma Case: त्विशा शर्माच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप
33 वर्षीय त्विशा शर्मा भोपळामधील तिच्या सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळली होती. तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. 12 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी (23 मे 2026) 13 दिवसांनी त्विशा शर्मावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्विशाच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात आरोप करत असताना तिच्या चारित्र्याविरोधात सासरच्या मंडळींकडून धक्कादायक दावे करण्यात येत आहेत. मृत्यूच्या 13 दिवसानंतर काल तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्विशाच्या सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या राजकीय व सामाजिक दबावामुळे पहिल्या पोस्टमार्टममध्ये तथ्य लपवण्यात आल्याचे आरोप त्विशाच्या कुटुंबीयांनी केले होते. समर्थ सिंगशी लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच, 12 मे रोजी आपल्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. त्विशाच्या कुटुंबीयांनी पती समर्थ सिंह आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ तसेच आर्थिक मागण्यांचे आरोप केले आहेत. तपास प्रक्रियेत आलेल्या त्रुटी, पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप करत फोन रेकॉर्ड सह इतर पुराव्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
Twisha Sharma Case: काय आहे मूळ प्रकरण?
12 मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत 33 वर्षीय त्विशा शर्मा हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्विशाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे. ट्विशाचा पती आणि सासूने तिची हत्या करून आत्महत्येची खोटी कथा रचल्याचा दावा वडील व भावाने केला आहे. कटारा हिल्स पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पती समर्थ, सासू गिरीबाला सिंह यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी 6 सदस्यांची विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा