Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला ‘ऑब्सेशन’; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


Obsession OTT Release Date: हॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर हॉरर चित्रपट ‘ऑब्सेशन’ (Obsession) आता थिएटरनंतर ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नेमका कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याची माहिती समोर आली आहे. 2026 मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या हॉरर चित्रपटांपैकी एक असलेला ‘ऑब्सेशन’ आता मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरल्यानंतर ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. भारतातील सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता त्याच्या ओटीटी रिलीजची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर ही प्रतीक्षा संपणार असून चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

2026 मधील गाजलेला हॉरर थ्रिलर

‘ऑब्सेशन’ हा एक सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध यूट्यूबर करी बार्कर (Curry Barker) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली असून एडिटिंगची जबाबदारीही सांभाळली आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही. इंडी नवारेट, मायकेल जॉन्सन आणि मेगन लॉलेस यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

भयावह दृश्यांनी वाढतो थरार

या चित्रपटाची कथा आणि सादरीकरण प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारं आहे. सुमारे 1 तास 49 मिनिटांच्या या चित्रपटात मोठमोठे जंप स्केअर्स किंवा भीतीदायक संवाद नसतानाही प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना अस्वस्थ करून सोडतो. कलाकारांच्या अभिनयातील भाव आणि वातावरणनिर्मितीमुळे चित्रपटाचा थरार अधिक प्रभावी ठरतो.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा बिअर आणि निक्की या दोन पात्रांभोवती फिरते. बिअरचं निक्कीवर प्रेम असतं आणि तीही त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करावं, अशी त्याची इच्छा असते. एके दिवशी त्याला ‘वन विश विलो’ नावाचं रहस्यमय झाड सापडतं. त्याच्याकडे तो अशी इच्छा व्यक्त करतो की निक्कीने फक्त त्याच्यावरच प्रेम करावं. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो त्या झाडाची फांदी मोडतो आणि त्याची इच्छा खरीही ठरते. मात्र, या इच्छेची त्याला अत्यंत भीषण किंमत मोजावी लागते. त्यानंतर घटनांना भयावह वळण मिळतं.

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

प्रदर्शनानंतर ‘ऑब्सेशन’ची जगभरात मोठी चर्चा झाली. या चित्रपटाने जगभरात सुमारे 409 दशलक्ष डॉलरची कमाई केली असून भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 3,900 कोटी रुपये इतकी आहे.

 ‘ऑब्सेशन’ची OTT रिलीज डेट

थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट Netflixवर स्ट्रीम होणार आहे. IMDb वर 8 रेटिंग मिळालेला हा हॉरर थ्रिलर 17 नोव्हेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *