Uday Samant Finantial Help to Sairat Fame Arbaaj Sheikh: ‘सैराट’ चित्रपटात ‘सल्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख (Arbaaj Sheikh) त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी केलेल्या व्हिडीओमुळे सध्या चर्चत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता अरबाज शेख याने सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलच्या आवारातून व्हिडिओ केला होता. गेल्या आठ दिवसांपासून ब्रेन हॅमरेज झाल्याने त्याच्या वडिलांना या रुग्णालयात ऍडमिट केले होते. मात्र, रुग्णालयाने त्यांच्याच मेडिकलमधून औषध खरेदीसाठी सक्ती केल्याचा सांगत त्याने रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर आरोप केले होते. या व्हिडिओची प्रशासनाकडून आणि राजकीय वर्तुळातूनही दखल घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सूचना केल्यानंतर अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचाराकरिता सोलापुरातील वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अभिनेता अरबाज शेखला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीचा धनादेश नुकताच त्यांनी अरबाज शेखला सुपूर्द केला.
अरबाज शेखच्या वडिलांसाठी उदय सामंत यांची आर्थिक मदत
‘सैराट’ मधील ‘सल्या’ या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर सध्या सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अरबाजच्या कुटुंबावर आलेल्या या संकटाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आज सकाळीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत, मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजच्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीने 1 लाख रुपयांचा धनादेश त्वरित अरबाजकडे सोपवला. वळसंगकर हॉस्पिटलमधील उपचाराच्या खर्चासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे. एका उदयोन्मुख कलाकाराच्या कुटुंबाला धीर देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि दातृत्वाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल
मराठी अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांना सोलापूरचा नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, या रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.या व्हिडिओची दखल घेत सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबल हॉस्पिटलचे पाहणी केली.या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्यानंतर तातडीने औषध विक्री बंद करण्याच्या आदेश दिल्याची माहितीही अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. दरम्यान, या संदर्भातील एबीपी माझा ने दिलेल्या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी या विडिओची दखल घेत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना सोलापुरात जाऊन भेट घेण्याचे सूचना दिल्या होत्या.त्यानुसार चिवटे यांनी अरबाज शेख यांची भेट घेत त्यांच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनंतर सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचे उपचार करण्यासाठी पुढाकार घेतलाय.
शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तसेच एस पी न्युरोसायन्सच्या डॉ. वळसंगकर यांना वैद्यकीय मदत करण्याचे विनंती केली, त्यानुसार डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत करण्याचे मान्य केलं आहे. अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान मोठा खर्च झाल्याने आर्थिक मदत आणि हॉस्पिटलकढून होणारी लूट याविषयी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर केला होता.