Girish Mahajan on Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे (Grand Event) आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नाथाभाऊंचा जाहीर भाजप प्रवेश पार पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जळगावात सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना खोचक टोला लगावला आहे.
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश तुमच्यामुळे रखडला आहे का? असा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, “खडसेंचा प्रवेश माझ्यामुळे कसं काय रखडला? मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन आहे. मी तर छोटा माणूस आहे, माझी मुंबईपर्यंत देखील हॉटलाईन नाही आहे. मी आपल्या जळगाव जिल्ह्यापुरता बरा आहे. निश्चितच त्यांना जर वरतून ग्रीन सिग्नल मिळाला आहे तर ठीक आहे. कोणाची काही अडचण आहे का? मागच्या वेळेस ते म्हटले होते की, आम्ही फोटो काढला, गळ्यात रुमाल टाकला आणि फोटोच गायब झाले, असं काहीतरी ते म्हणत होते. आपल्याला काही माहिती नाही त्यांच्याबद्दलची. मी भविष्यकार नाही, मी काय संजय राऊत आहे का?” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
Girish Mahajan on Eknath Khadse: खडसेंबद्दल अधिक माहिती गुलाबभाऊच सांगू शकतील
“खडसेंच्या भाजप प्रवेशा संदर्भात गुलाबभाऊंना (Gulabrao Patil) माहिती आहे, त्या संदर्भात मला तर काही माहीत नाही. खडसेंसंदर्भात ते जास्त माहिती ठेवतात. मी सध्या जिथे जिथे पाऊस पडला, पूर आला, दरड कोसळली, घरात पाणी शिरलं… या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून व्यस्त आहे, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. खडसेंबद्दल अधिक माहिती गुलाबभाऊच सांगू शकतील,” असे देखील गिरीश महाजन म्हणाले.
Girish Mahajan on Eknath Khadse: वाढदिवसाच्या निमंत्रणावर दिली प्रतिक्रिया
नाथाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या भव्य सोहळ्यावर बोलताना ते म्हणाले, “एकनाथ खडसे ही मोठी माणसं आहेत, त्यांचा वाढदिवस तसाच साजरा होईल. दिल्लीपासून सगळे लोक येतील. मी त्याबाबत काय बोलू? त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हाला तर अजून काही निमंत्रण नाही आणि असा ‘जर-तर’चा प्रश्न नाही, जर निमंत्रण मिळालं तर त्या संदर्भात विचार करू,” अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा