Vinayak Raut Marathi News: ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे. या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते- गिरीजा राऊत (Vinayak Raut News)
माझी सासू माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्या बद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे. माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल, असा विकृतपणे बागत होता. तसेच N.C.R.B (एन.सी.आर.बी) त्याचेवडील, विनायक राऊत, हे खासदार असल्याने त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू, शामल राऊत व गितेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता, असं गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
माझे पती यांनी मला खूप शिवीगाळ करून दमदाटी केली- गिरीजा राऊत (Vinayak Raut Marathi News)
सदर बाबत मुंबई येथील विविध डॉक्टरांकडे तपासणीसाठी मी व माझे पती जात असताना ते मला धमकावून न्ह्यायचे की सगळ्यांना हेच सांगायचं की, आमच्यात शारीरिक संबंध एकदम सुरळीत सुरु आहेत आणि आम्ही बेबी प्लॅन करतो आहोत. मी सतत गोळ्या घेतल्याने डॉ. पुष्पा देशमुख, बांद्रा, मुंबई यांनी माझे पती यांना मला गोळ्या न देणेबाबत सूचित केले. त्यामुळे माझे पती यांनी मला खूप शिवीगाळ करून दमदाटी केली होती, असा आरोपही विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी केला आहे.
संबंधित बातमी:
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा