Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला


England vs India 5th T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी पुन्हा एकदा समोर आली. आधीच मालिका गमावलेल्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि कर्णधारपद या तिन्ही विभागांत अपेक्षाभंग केला. त्याचा पुरेपूर फायदा घेत इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद तब्बल 257 धावा उभारल्या. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या डावात जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत विक्रमी भागीदारी रचली. बटलरने 64 चेंडूत 131 धावांची स्फोटक खेळी केली, तर ब्रूकने 45 चेंडूत नाबाद 95 धावांची तुफानी खेळी साकारली.

कर्णधार श्रेयस अय्यरच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह

या सामन्यात भारताचे कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले. भारतीय संघ चार प्रमुख गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे हे अतिरिक्त पर्याय होते. सूर्यांश शेडगेने पहिल्या षटकात केवळ तीन धावा दिल्यानंतरही त्याला लगेच बाजूला करण्यात आले. दुसरीकडे, अक्षर पटेलने पहिल्या दोन षटकांतच 34 धावा दिल्या. त्याच्या दुसऱ्या षटकात तब्बल 25 धावा गेल्या. तरीही अय्यर यांनी त्याच्याकडून पूर्ण चार षटके टाकून घेतली. अक्षरने अखेर 4 षटकांत 63 धावा खर्च केल्या. शिवम दुबेचा वापरही उशिरा करण्यात आला. त्याला थेट 19वे षटक देण्यात आले. सामन्यादरम्यान गोलंदाजांच्या वापराबाबत अय्यर यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेचा विषय ठरले.

पुन्हा एकदा सुमार क्षेत्ररक्षण

या मालिकेत सातत्याने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणावर टीका होत होती आणि पाचव्या सामन्यातही त्यात कोणतीही सुधारणा दिसली नाही. भारतीय खेळाडूंनी अनेक झेल सोडले, ज्याचा फायदा बटलर आणि ब्रूक यांनी घेत मोठी धावसंख्या उभारली. सोपे झेल सुटल्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी मिळाली.

बटलर-ब्रूकची ऐतिहासिक भागीदारी

जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या टी-20 इतिहासात प्रथमच कोणत्याही जोडीने 200 हून अधिक धावांची भागीदारी केली.

बटलरने आपल्या 131 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 8 षटकार ठोकले. त्याचबरोबर भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज होण्याचाही मान त्याने मिळवला. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूकने नाबाद 95 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार लगावत भारताच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले.

भारतीय गोलंदाजांची महागडी कामगिरी

जवळपास प्रत्येक गोलंदाजाची जोरदार धुलाई झाली आणि कोणालाही धावांवर अंकुश ठेवता आला नाही. अक्षर पटेलने 4 षटकांत तब्बल 63 धावा दिल्या, तर प्रिन्स यादवनेही 4 षटकांत 60 धावा खर्च केल्या. सूर्यांश शेडगेच्या 3 षटकांत 39 धावा वसूल झाल्या, तर अर्शदीप सिंगने 33 आणि प्रसिद्ध कृष्णाने 38 धावा दिल्या. शिवम दुबेने एका षटकात 22 धावा दिल्या, मात्र त्याने 2 विकेट्स घेत काहीसा दिलासा मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांच्या या महागड्या कामगिरीमुळे इंग्लंडला 20 षटकांत 257 धावांचा विक्रमी डोंगर उभारता आला.

हे ही वाचा –

Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *