Last Updated:
तरुणीने केलेल्या आंतरजातीय विवाहावरून जळगावात मोठा राडा झाला. दोन्ही कुटुंबांमध्ये पोलीस स्टेशनमध्येच दंगा झाला. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठा राडा झाला. दोन कुटुंबातल्या राड्यात पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
आंतरजातीय विवाहावरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. दोन्ही कुटुंबांतील सदस्य पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचला.
प्रकरण नेमकं काय?
मेहरूण भागातील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्र असंतोष होता. याच वादातून दोन्ही बाजूचे लोक एमआयडीसी पोलीस ठाण्यात समोरासमोर आले. सुरुवातीला पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरू झाली. पोलीस सामोपचाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र दोन्ही कुटुंबांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने वाद हाताबाहेर गेला.
पोलीस ठाण्यावर दगडफेक, खिडक्यांच्या काचा फुटल्या
शाब्दिक वादाचे रूपांतर आधी हाणामारीत आणि नंतर थेट दगडफेकीत झाले. पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर तुटून पडले. यात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. हा वाद रोखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी करत असलेला एक पोलीस कर्मचारीही या दगडफेकीत जखमी झाला.
दंगल नियंत्रण पथक तैनात, पोलिसांचा लाठीमार
पोलीस ठाण्याच्या आवारातील वाढता तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेची बिघडत चाललेली स्थिती पाहता, पोलिसांनी तातडीने ‘जलद कृती दलाला’ पाचारण केले. जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदोलक आणि नातेवाईकांची पळापळ झाली.
मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात
पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर आणि अतिरिक्त कुमक तैनात केल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाणे परिसर शांत झाला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलीस दोन्ही बाजूंना शांत करून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. सध्या मेहरूण आणि पोलीस ठाणे परिसरात शांतता आहे.
Jalgaon,Maharashtra
