Last Updated:
जळगावच्या रावेरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी आधीच जेरबंद केले. खबऱ्याच्या एका फोनमुळे पोलिसांना या संभाव्य गुन्ह्याची कुणकुण लागली.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील रावेर शहर आणि तालुक्यात दरोड्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला. पालहून रावेरकडे येत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांच्या माहितीच्या आधारे हत्यारांसह अटक करण्यात आली.
याबाबत रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण हे पाल दूर क्षेत्र येथे कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की, पाल गावात एक पांढऱ्या रंगाची ईको चारचाकी वाहन येत असून, त्यात अंदाजे ५ ते ६ व्यक्ती पाल गावात संशयास्पदरित्या फिरत आहे. ते वाहन हे रावेर शहराकडे सुसाट जात आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लागलीच रावेर गुन्हे शोध पथकाला योग्य त्या सूचना देऊन रावेरकडून पालकडे रवाना केले. तसेच एक पथक पालकडून रावेरकडे पाठवले.
आभोडा गावाजवळ हे वाहन मोटारसायकलींना कट मारून पुढे जात असताना गुन्हे शोध पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांचा सुगावा लागताच हे भरधाव वाहन रावेर शहरातील आठवडे बाजाराच्या दिशेने जाऊन बऱ्हाणपूर रोडवरील एका शेताजवळ घाई घाईत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चिखलात फसले या दरम्यान त्यांच्या मागे पोलिसांसह इतर १५ ते २० व्यक्तींचा जमाव ही पाठलाग करत होता. त्यांचे वाहन फसल्याचे पाहून जमावाने त्यांच्या गाडीजवळ जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातील इतर व्यक्ती हे शेतशिवाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र इतर दोन व्यक्ती जमावाच्या हाती लागल्या.
पोलीस पोहोचेपर्यंत जमावाने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते. पोलिसांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना लागलीच जमावातून सोडवून ऑटो रिक्षाने रावेर ग्रामीण रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.
या व्यक्तींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते काही एक सांगण्यास तयार नव्हते. उडवाउडवीची उत्तरे देत होते. परंतु या व्यक्तींच्या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनातुन एक लोखंडी तलवार, टॉमी, लाल मिरची पुड, दोरखंड, आणि ५०० रुपये दराच्या ३ लाख रुपये किमतीच्या चिल्ड्रन बँकेच्या नकली नोटा तसेच मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी असे मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील संशयित आरोपी निखिल प्रवीण पाटील व अल्ताफ जलाल शेख (वय २६) दोघी (रा. साईनगर, घोडबंदर रोड कासार वडली जि.ठाणे) फरार आरोपी मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) व त्याचे दोन साथीदार नाव गाव कळू शकले नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकाने केली आहे.
Jalgaon,Maharashtra
