Last Updated:
रोज घरात काम करायला येणाऱ्या मोलकरणीने घरातच असं काही कांड केलं, जे पाहून मालकीणही हादरली. अखेर या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली आणि…
पुणे: विश्वास टाकून ज्या मोलकरणीला घराची किल्ली सोपवली, तिनेच मालकिणीच्या विश्वासाला मोठा तडा दिला. रोज घरात काम करायला येणाऱ्या मोलकरणीने घरातच असं काही कांड केलं, जे पाहून मालकीणही हादरली. अखेर या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली आणि पोलिसांनी चौकशी करताच मोलकरणीनं सगळंच कांड सांगितलं. ही धक्कादायक घटना हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. यात घरकाम करणाऱ्या महिलेनंच घरातील तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
घरात कोणतीही तोडफोड न करता अगदी हुशारीने झालेल्या या चोरीने पोलीसही चक्रावले होते. ना घराचं कुलूप तुटलेलं होतं, ना कपाटाचा दरवाजा. त्यामुळे, चोरी नेमकी कोणी केली, असा प्रश्न होता. मात्र खाक्या दाखवताच ही मोलकरीण पोलिसांसमोर पोपटासारखं बोलू लागली. तिने दिलेली कबुली ऐकून घरमालकीणही पुरती शॉक झाली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मोलकरणीचे नाव आहे.
ही घटना ४ जुलै रोजी हडपसर परिसरातील एका घरात घडली होती. घरमालकिणीने कपाटातील बॅगेत ७ लाख २० हजारांचे दागिने सुरक्षित ठेवले होते. मात्र ते अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घरात चोरीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. कपाटाचे कुलूप किंवा दरवाजा कुठेही तोडण्यात आला नव्हता. यामुळे हा प्रकार घरात उपस्थित असलेल्याच कोणीतरी केला असावा, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी घरात नियमित ये-जा करणाऱ्या लोकांची यादी तयार करून चौकशी सुरू केली.
संशयाची सुई घरातील मोलकरीण अंबिका खडगेकर हिच्यावर स्थिरावली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी अंबिका पोलिसांच्या पोलिसी खाक्यासमोर फार काळ टिकू शकली नाही. तिने गुन्हा मान्य करत, पैशांच्या गरजेपोटी आपणच हे दागिने चोरल्याची कबुली दिली. हडपसर पोलिसांनी अंबिका खडगेकरला तात्काळ अटक केली असून, तिच्याकडून चोरीला गेलेले सर्वच्या सर्व दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही धडक कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची पडताळणी करणे किती गरजेचे आहे, हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Pune,Maharashtra
पुणे : काम करायला घरात यायची अन् करायची भलतंच कांड; पोलिसांसमोर पोपटासारखं बोलली मोलकरीण, ऐकून मालकीणही शॉक
