Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ही इमारत तळमजल्यासह तीन मजली असून, यामध्ये तळमजल्यावर पार्किंग (Parking), पहिल्या मजल्यावर कॅन्टीन (Canteen) आणि दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम (Conference Room) आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 23 कामगार (Workers) होते, त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरील 5 कामगार तातडीने बाहेर पडले होते. तर सायंकाळी 6 आणि मध्यरात्री 3 वाजेपर्यंत एकूण 9 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
Moshi Building Collapse: मध्यरात्री 2 वाजता ‘साउंड व्हायब्रेशन टेस्ट’
या बचावकार्यादरम्यान मध्यरात्री जवानांकडून एक अत्यंत महत्त्वाची ‘साउंड व्हायब्रेशन टेस्ट’ (Sound Vibration Test) करण्यात आली. ढिगाऱ्याखाली आणि कोसळलेल्या स्लॅबच्या खाली अडकलेल्या कामगारांच्या हृदयाचे ठोके (Heartbeats) सुरू आहेत का, हे तपासण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला. मात्र, दुर्दैवाने या चाचणीदरम्यान आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे.
Moshi Building Collapse: भिंतीला होल पाडून जवानांचा कॅन्टीनमध्ये प्रवेश
प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुढचे सलग सहा तास जेसीबी (JCB) आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने इमारतीच्या बाजूला साचलेले कचऱ्याचे अवाढव्य ढीग हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास जवानांनी पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठे छिद्र (Hole) पाडले. या छिद्रातून 9 ते 10 जवानांनी थेट कॅन्टीनमध्ये प्रवेश केला आहे.
Moshi Building Collapse: आता कॅन्टीन अन् पार्किंगमध्ये शोधमोहीम
अनेक कामगार पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी कॅन्टीनमध्ये आणि त्यानंतर तळमजल्यावरील पार्किंगच्या वाहनांमध्ये कोणी अडकले आहे का? याची शोध मोहीम राबवली जात आहे. अद्यापही आतमध्ये 8 ते 9 कामगार अडकल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात असून, जवानांकडून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे.
Moshi Building Collapse: सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न: गिरीश महाजन
दरम्यान, या भीषण घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि ते स्वतः रात्रभर तिथेच तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गिरीश महाजन एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. जास्त पाऊस पडल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये आल्याने इमारत पडली. अत्यंत कमी कालावधीत 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. तीन लोकांना आतमध्ये जाऊन चहा आणि बिस्किटे दिली आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांना सध्या बाहेर काढता येत नाहीये. त्यांचे पाय पिलरखाली अडकलेले आहेत. ते दिसत असूनसुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाहीये. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.
Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटनेत महापालिकेकडून नियमांची पायमल्ली
– वेस्ट एनर्जी प्रकल्पाचे कार्यालय आणि कचऱ्याचा ढीग यात किती अंतर होतं?
– सुरक्षा भिंत होती का? असेल तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची पाहता सुरक्षा भिंत किती फूट उंचीची होती?
– कार्यालय आणि कॅन्टीन इतर सुरक्षित जागेवर उभारता आलं असतं का?
– दुर्घटनेनंतर इमारतीत किती कामगार अडकले, या आकडेवारीचा घोळ?
– मुख्य अभियंता संजय कुलकर्णींनी 16 कामगार, पालिका आयुक्त विजय सुर्यवंशीनी 20 कामगार अन मग मंत्री गिरीश महाजनांनी 23 कामगार अडकल्याची माहिती दिली.
– स्वतःच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या एका इमारतीत किती जण असतील? हे पालिकेला माहीत नसणे, ही बाब गंभीर आहे.
– त्यामुळं मूळ आकडा लपवण्याचा हेतू तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जातीये.
आणखी वाचा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून