मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वसई-नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळांवर अद्यापही पुराचे पाणी साचून असल्याने रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा केवळ वसई स्थानकापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारपासूनच विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेमुळे वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे.
पुढील स्थानकांकडे जाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थानकात रखडलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, अन्न किंवा इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
Vasai Railway Station Crowd : प्रवाशांना ट्रॅकवरून पायी जाण्याची वेळ
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा परिसरातील रेल्वे रुळांवर पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नसल्याने वसईच्या पुढे लोकल गाड्या नेणे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ववत होण्यास आणखी काही तासांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक प्रवासी सोमवारी दुपारी 3 वाजेपासून स्थानकातच अडकून पडले आहेत.
प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी बस सेवा किंवा मदत न मिळाल्याने, शेवटी हताश झालेले काही प्रवासी आता गटागटाने नालासोपारा आणि विरारच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरूनच (Railway Tracks) पायी जाण्याचा जीवघेणा प्रवास करत आहेत. रात्रीच्या अंधारात आणि पाण्यातून चालताना कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे आणि पर्यायी वाहतूक पुरवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
Vasai Ashwin Nagar Rescue : अश्विन नगरमध्ये ‘एबीपी माझा’कडून आजारी मुलांचा रेस्क्यू
दुसरीकडे, वसई-विरार शहरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक निवासी भागांमध्ये कमरेएवढे पाणी साचले आहे. वसईच्या अश्विन नगर (Ashwin Nagar) परिसरात राहणाऱ्या आलिया मोहम्मद अशपाक यांच्या कुटुंबाला या जलमय स्थितीचा मोठा फटका बसला. आलिया यांची दोन लहान मुले, 7 वर्षांची अझरा आणि 9 वर्षांचा झेन ही दोन्ही मुले तीव्र तापाने आजारी होती. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते, मात्र घराबाहेर कमरेएवढे पाणी साचल्याने कुटुंब हताश झाले होते.
ही गंभीर परिस्थिती समजताच ‘समाधान फाऊंडेशन’ आणि ‘एबीपी माझा’च्या (ABP Majha) टीमने तात्काळ पूरग्रस्त भागात धाव घेतली. त्यांनी बोटीच्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही आजारी मुलांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. अश्विन नगर परिसरातील या सोसायटीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असून, पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
ही बातमी वाचा: