Last Updated:
लाईव्ह मॅच सुरू असतानाच श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट मॅच सुरू असतानाच हा खेळाडू मैदानात कोसळला.
मुंबई : लाईव्ह मॅच सुरू असतानाच श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट मॅच सुरू असतानाच हा खेळाडू मैदानात कोसळला. या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्यामुळे ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शनिवारी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाने क्रिकेट मॅचचं आयोजन केलं होतं, या सामन्यात खेळत असताना 46 वर्षीय खेळाडू जुल्फिकार मैदानातच कोसळला. या घटनेचा भयावह व्हिडिओ समोर आला आहे.
जुल्फिकार या सामन्यात बॅटिंग करत होता आणि त्याने काही रनही केल्या होत्या, पण अचानक तो मैदानात बेशुद्ध होऊन कोसळला. श्रीलंकेतील बेरुआला मैदानावर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं, पण सामना सुरू असताना अचानक जुल्फिकारला अस्वस्थ वाटायला लागलं. जुल्फिकार मॅचच्या चौथ्या ओव्हरला बॅटिंगला आला आणि त्याने काही बॉलचा सामनाही केला, पण त्यानंतर बॅटिंगचा स्टान्झ घेत असतानाच तो मैदानात पडला.
Heartbreaking tragedy in Beruwala. Sri Lanka
A young cricketer collapsed and passed away while batting during a school old boys’ association cricket carnival today. He was on 6* off 3 balls when he suffered a suspected heart attack. The tournament has been suspended. pic.twitter.com/tUvjzbWuwH
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) July 5, 2026
जुल्फिकार मैदानात कोसळल्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली. दोन्ही टीमचे खेळाडू आणि अंपायर धावत जुल्फिकारच्या जवळ गेले. जुल्फिकारला प्रथमोपचार देण्यासाठी मेडिकल टीमही मैदानात आली, पण जुल्फिकार प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला मैदानाबाहेर असलेल्या ऍम्ब्युलन्समधून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
जुल्फिकारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा तपास करण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुल्फिकारचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला आहे. मैदानात घडलेल्या या घटनेमुळे खेळाडू, अंपायर, मॅच अधिकारी, कॉमेंटेटर आणि प्रेक्षकही धक्क्यात आहेत, त्यामुळे पुढच्या सर्व मॅच स्थगित केल्या आहेत. याचसोबत त्यांनी जुल्फिकारला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 06, 2026 11:33 PM IST
