मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाचे तांडव सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे, तर ठाणे आणि मुंबई परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
संभाव्य पाणी साचण्याची स्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (7 जुलै) मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai School Closed : मुंबईतील शाळा बंद
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Thane District School Closed : ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडीत शाळांना सुट्टी
ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने ठाण्याला ऑरेंज अलर्ट दिला असला, तरी सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांनाही सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी परिसरातील शाळांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळवावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने तिथे शाळांसोबतच अंगणवाड्यांनाही सुट्टी असेल. तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही बंद राहणार आहेत.
Nashik Trimbakeshwar Cloudburst : नाशिकमध्ये 10 वर्षांतील सर्वाधिक पावसाची शक्यता
नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवारचा दिवस अत्यंत धोक्याचा म्हणजेच ‘रेड अलर्ट’चा असणार आहे. नाशिक शहरापासून ते थेट त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या पट्ट्यात ढगफुटीसदृश पावसाचा (Cloudburst) अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिकमध्ये यंदा गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तश्रृंगी देवी गड देखील भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आधीच दिले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Satara School Holiday : साताऱ्यातील पाच तालुक्यांमध्ये शाळा बंद
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात 7 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी या पाच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असून डोंगरदऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
या आपत्कालीन स्थितीमुळे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई व सातारा या पाच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना 7 जुलै रोजी एक दिवसाची जाहीर सुट्टी घोषित केली आहे. सर्व नागरिकांनी आणि पर्यटकांनी योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही बातमी वाचा: