मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्व विभागानं देखील मोठा निर्णय घेतला आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
कर्जत–लोणावळा मार्गादरम्यान घाट विभागात भूस्खलन
कर्जत–लोणावळा मार्गादरम्यान घाट विभागात भूस्खलन झालं आहे. यामुळं रेल्वे सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. 200 हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. लोणावळा–कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. 6 जुलै रोजी अवघ्या चार तासांत 140 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. याआधी 5 जुलै रोजी 327 मिमी आणि 4 जुलै रोजी 162 मिमी पाऊस झाला होता.
रेल्वे सेवांवरील परिणाम :
– एकूण 26 गाड्या रद्द
– 47 गाड्यांचे मार्ग बदलले
– 19 गाड्या अंशतः गंतव्यापर्यंतच धावणार
– 15 गाड्या अंशतः प्रारंभ करण्यात आल्या
– 3 गाड्या पुनर्नियोजित (Rescheduled)
– 5 गाड्या पुनर्नियोजित करून मार्गही बदलण्यात आला
अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
मुंबई- पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस यांसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड किंवा सुरत–जळगाव–मनमाड–दौंड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. घाट विभागात सुरू असलेल्या पुनर्बांधणी आणि ट्रॅक सुरक्षिततेच्या कामासाठी 200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, आणखी 200 अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली
पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं आहे. कमानी सारखं बांधकाम कोसळलं. हा सगळा राडारोडा हटवायला साडे अठरा तास लागले अन पुण्याहून मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका खुली करण्यात आली. पण यानिमित्ताने सात हजार कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.