Raigad Rain News : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरड कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने महाड – विन्हेरे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. मातीचा मोठा ढिगारा आणि सोबत झाड रस्त्यावर आल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
महाड पोलीस महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड मोठी असल्यानं अनेक तास मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. मातीचा मोठा ढिगारा आणि सोबत झाड रस्त्यावर पडले आहे. महाडकडून खेड, दापोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.
मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड
रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड सुरु आहे. म्हसळा तालुक्यातील आंबेत बागमांडला रोडवर झाड उन्मळून कोसळले आहे. आंबेत बागमांडला रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. उन्मळून पडलेले झाड हटवण्याचे काम सुरु आहे.
रायगडमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रभावी समन्वयातून आतापर्यंत 200 हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावांतील 265 कुटुंबांमधील 937 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, आतापर्यंत 236.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खालापूर तालुक्यात सर्वाधिक 323.3 मि.मी., महाडमध्ये 272.2 मि.मी. तर सुधागडमध्ये 268 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील माडखोल धवडकी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोहार शाळेचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थ, बांधकाम कर्मचारी झाड बाजूला करण्याचे काम करत आहेत. झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे परिसरातील पुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी
मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून 8 जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. तर मुंबई उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.