मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून 8 जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. तर मुंबई उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
मानखुर्द भागात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला, सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाले ओसांडून वाहायला सुरुवात
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी नाले ओसांडून वाहायला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील वैतरणा तानसा सूर्या देहेरजा पिंजाळ या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून तानसा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर वैतरणा नदी धोक्याच्या पातळीवर असून नदी काठावरील गावांमध्ये या नदीचे पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वैतरणा नदीला मोठा पूर आला आहे.
सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर
आळंदीत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पावसाचा जोर काहीसा ओसरला असून सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचले आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या आणि परवा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याने आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाट परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगितले आहे. याशिवाय, मुख्यमंत्री यांनीही वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आळंदी आणि देहूकडे येण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांनी सध्याची पावसाची परिस्थिती लक्षात घेता आळंदी किंवा देहूत न येता पुण्यातूनच वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.