Last Updated:
Accident News : टिटवाळ्याहून परतताना जीपीएसने दाखवलेल्या नव्या महामार्गावर गेल्यानंतर कल्याणच्या अरुणा कुलकर्णी यांचा बदलापुरात दुर्दैवी अंत झाला. डोळ्यांदेखत आई गमावलेल्या मुलाचा आक्रोश पाहत सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले.
कल्याण : तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याचदा प्रत्येकाचा सोयीचा ठरतो, मात्र काहीवेळा तोच वापर अंगाशी कसा येऊ शकतो, याची एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना बदलापूर शहरात नुकतीच घडलेली आहे. टिटवाळा येथून बाप्पाचे देवदर्शन करुन आपल्या मुलासोबत घरी येत असलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरात राहत असलेल्या अरुणा कुलकर्णी या 28 जून रोजी त्यांचा मुलगा प्रतीक कुलकर्णी याच्यासोबत बाईकवरुन टिटवाळा येथील प्रसिद्ध गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दिवसभर बाप्पाचे दर्शन घेऊन आणि लेकासोबत आनंदात वेळ घालवून त्या रात्रीच्या वेळी कल्याणच्या दिशेने परत येत होते.
साधारण रात्री साडे आठच्या दरम्यान रस्त्याचा योग्य अंदाज येत नसल्याने प्रतीकने मोबाईलवर ऑनलाईन नकाशा सुरु केला. पण जीपीएसने त्यांना नेहमीचा रस्ता न दाखवता बदलापूरजवळून जाणारा उरण बंदर ते बडोदे हा नवीन महामार्ग एक रस्ता दाखवला. शिवाय अनोळखी रस्ता असूनही नकाशावार विश्वास ठेवून प्रतीकने दुचाकी त्या मार्गावरुन घेतली होती.
दुर्दैवी गोष्ट म्हणजे रात्रीची वेळ आणि रस्त्यावर असलेला अंधार त्यामुळे रस्त्याचा अंदाज लावणे कठीण जात होते. दरम्यान दुचाकी ही जांभळे गावातील पुलावर आली असता तिथे एक मोठा खड्डा होता. त्यामुळे वेग नियंत्रित करेपर्यंत दुचाकी थेट खड्ड्यात आदळली आणि अनियंत्रित होऊन रस्त्यावर घसरली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर पाठी बसलेल्या अरुणा या रस्त्यावर जोरदार आपटल्या. ज्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कल्याण आणि बदलापूर परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai,Maharashtra
मोबाईल मॅपने रस्ता चुकवला अन् काळानं गाठलं; बाप्पाच्या दर्शनाहून परतताना महिलेचा घात झाला, पोटच्या लेकाचा टाहो
