FIFA 2026: हॅरी केनवरील जादूटोणा झटक्यात दूर? घानाच्या मांत्रिकाची दावा आणि इंग्लंडचा विजयImage Credit source: Getty Images
England vs DR Congo, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अनेक फुटबॉलपटू अंधश्रद्धा पाळत काही गोष्टी आवर्जून करतात. अनेक फुटबॉलपटू मैदानात उतरण्यापासून पहिलं पाऊल ठेवण्यापासून काही गोष्टी पाळतात. दिग्गज फुटबॉलपटूंबाबत सोशल मीडियावर या गोष्टी आपण ऐकल्या आणि वाचल्या असतील. आता इंग्लंड आणि कांगो फुटबॉल सामन्यानंतर या बाबी चर्चेत आल्या आहेत. राउंड ऑफ 32 या बाद फेरीत इंग्लंडने कांगोचा पराभव केला आणि घानाच्या प्रसिद्ध मांत्रिकाची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला बंधनातून मुक्त केल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर केनने मैदानात जबरदस्त कामगिरी केली आणि दोन गोल मारत इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडच्या फुटबॉल वर्ल्डकप इतिहासात 60 वर्षानंतर असा विक्रम पाहायला मिळाला आहे. 1966 नंतर असं कधीच घडलं नव्हतं.
घानाच्या मांत्रिकाचं नेमकं काय प्रकरण?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत 23 जून रोजी इंग्लंड आणि घाना यांच्यात सामना खेळला गेला होता. हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला आहेत. या सामन्यापूर्वी घानाचा मांत्रिक नाना क्वाकू बोंसम याने दावा केला होता की, त्याने हॅरी केनवर जादूटोणा केला आहे. त्यामुळे घानाविरुद्ध गोल करू शकणार नाही. बोंसम यांचं भाकीत खरं होताना दिसलं. घानाविरुद्धच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात त्याने चेंडूला फक्त 19वेळा स्पर्श केला. इतकंच काय या सामन्याच्या शेवटच्या क्षणी गोल मारण्याची सुवर्णसंधी चुकली. त्यामुळे सोशल मीडियावर मिश्किलपणे याचं श्रेय मांत्रिकाला दिलं गेलं. त्यानंतर हे प्रकरण ट्रेंड करू लागलं.
बाद फेरीत इंग्लंडच्या सामन्याच्या एक आठवड्याआधी घानाच्या मांत्रिकाच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली होती. कारण मांत्रिकाने दावा करत सांगितलं की, हॅरी केनवरील जादूटोणा दूर केला आहे. तसेच केन मैदानात चांगली कामगिरी करेल असं सांगितलं होतं. त्यानंतर हॅरी केन एका वेगळ्याच रुपात दिसला होता. बाद फेरीत कांगोने इंग्लंडवर कांगोन एका गोलने आघाडी घेतली होती. त्यामुळे इंग्लंडवर स्पर्धेतून बाद होण्याचं सावट घोंघावत होतं. असं असताना हॅरी केनने या सामन्याचं रूप पालटलं.
हॅरी केनकडून 60 वर्षापूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती
अटलांटा स्टेडियममध्ये कांगोविरुद्धच्या सामन्यात सातव्या मिनिटाला इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला होता. एक गोलने कांगोने आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधण्यासाठी झुंज द्यावी लागली. पण दुसऱ्या हाफमध्ये हॅरी केनने जबरदस्त खेळी केली. त्याने दोन गोल मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने पहिल्या हाफमध्ये गोल खाऊनही 60 वर्षानंतर बाद फेरीचा सामना जिंकला. यापूर्वी 1966 मध्ये जर्मनीविरुद्ध असं घडलं होतं. पण इंग्लंडने कमबॅक केलं आणि विजय मिळवला.