landslide on Badrinath route: मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये कहर केला आहे. राज्यात नद्यांना पूर आला आहे. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. बद्रीनाथ महामार्ग अनेक ठिकाणी बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळल्याने शेकडोच्या संख्येने भाविक अडकले आहेत. बद्रीनाथकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने महाराष्ट्रातल्या भाविकांचा सुद्धा खोळंबा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रवासी बद्रीनाथमध्ये अडकले आहेत. गेल्या 12 तासांपासून प्रवासी एकाच जागेवर अडकून आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून दरड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
उत्तराखंडच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या बहुतांश भागात मान्सून आता सक्रिय झाला आहे. पिथोरगड, रुद्रप्रयाग, चमोली, हरिद्वार, उधम सिंग नगर आणि बागेश्वरमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने बागेश्वरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे, प्रशासनाने आज 2 जुलै रोजी इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे. बागेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरावरून मलबा रस्त्यांवर आला आहे. ढिगाऱ्यांमुळे 14 ग्रामीण रस्ते बंद झाले असून, त्यामुळे सुमारे 50 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. रस्त्यांवरील ढिगारा हटवण्यासाठी प्रशासन जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर करत आहे.
मोठ्या ढिगाऱ्यांमुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद
चमोली जिल्ह्यातील गुलाबकोटीजवळ मोठ्या ढिगाऱ्यांमुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बद्रीनाथमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदीची पाणी पातळी वाढली आहे. पावसामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. तथापि, दर्शन सुरू आहे. गुलाबकोटी येथे बद्रीनाथ मार्ग बंद झाल्यामुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मान्सूनच्या काळात हवामानाचा बद्रीनाथ यात्रेवर नेहमीच परिणाम होतो. किंबहुना, मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे, प्रशासन भाविकांना सुरक्षित प्रवास करण्याचा सल्ला देत आहे.
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील धारी देवीजवळील शिरोबागड येथे ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला, त्यामुळे चारधाम यात्रेला निघालेले यात्रेकरू अडकून पडले आहेत. खराब हवामानामुळे, केदारनाथसाठी चालणाऱ्या सर्व आठ हेलिकॉप्टर सेवा 5 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, हा निर्णय यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार ही स्थगिती पुढे वाढवली जाऊ शकते.
टिहरीमध्ये नद्यांना पूर, भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद
टिहरी जिल्ह्यातील सततच्या पावसाचा जनजीवनावरील परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. भिलंगणा भागातील नाईलचमी गडातील पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासन आणि पोलीस हाय अलर्टवर आहेत. दरम्यान, भूस्खलन आणि झाडे पडल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी