India VS England News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 7 बाद 189 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके झळकावली, तर शिवम दुबेने 21 चेंडूत नाबाद 42 धावांची झंझावाती खेळी केली. मात्र सामना अनिर्णित राहिला असला, तरी काही भारतीय खेळाडूंची कामगिरी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यात संजू सॅमसन, ईशान किशन आणि उपकर्णधार तिलक वर्मा यांचा समावेश आहे.

संजू सॅमसनच्या अडचणी वाढल्या

युके दौऱ्यात संजू सॅमसनची बॅट अद्याप शांतच आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही तो स्वस्तात बाद झाला. सलग अपयशामुळे आता त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील सामन्यांतही तो धावा करण्यात अपयशी ठरला, तर संघ व्यवस्थापन बदलाचा निर्णय घेऊ शकते.

ईशान किशनवरही वाढला दबाव

आयसीसी टी-20 क्रमवारीतील अव्वल फलंदाज असलेल्या ईशान किशनसाठीही युके दौरा निराशाजनक ठरला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 1 आणि 12 धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये तो खातेही न उघडता बाद झाला. विशेष म्हणजे, मागील तीन डावांत तो दोन वेळा धावबाद झाला आहे. त्यामुळे त्याच्यावरील दबाव आणखी वाढला असून पुढील सामन्यांतही अपयश आल्यास त्याच्या जागेवर गदा येऊ शकते.

तिलक वर्माच्या संथ फलंदाजीने वाढवली चिंता

उपकर्णधार तिलक वर्माने धावा केल्या असल्या, तरी त्याचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय ठरत आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने मागील तीन डावांत 19 (21), 55 (46) आणि 13 (13) धावा केल्या. या स्थानावरील फलंदाजाकडून जलद गतीने धावा करण्याची अपेक्षा असते, मात्र तिलक अद्याप त्या भूमिकेत प्रभावी ठरलेला नाही.

टीम इंडियाकडे कोणते पर्याय?

ईशान किशन आणि तिलक वर्माला या मालिकेत आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांची खराब कामगिरी कायम राहिल्यास संघ व्यवस्थापन बदलाचा विचार करू शकते. दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी मात्र धोक्याची घंटा सर्वाधिक वाजताना दिसत आहे. त्याच्या जागी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

हे ही वाचा -

Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

Source link
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात