Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मद्यपानादरम्यान पत्नीवरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला.
छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी एकत्र बसलेल्या चार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. पत्नीवरून झालेला हा वाद इतका वाढला की, तिघांनी मिळून एका मित्राला झाडावर जोरात आदळले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमधील कांचनवाडी परिसरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली.
या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राजू किसन वंजारी (वय 33, रा. गौतमनगर, कांचनवाडी) असे आहे. माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी राजू वंजारी हा त्याचे मित्र सोनू गव्हाणे, युवराज गायकवाड आणि पांडुरंग गायकवाड यांच्यासोबत एका झाडाखाली बसून दारू पीत होता. मद्यपानादरम्यान पत्नीवरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. त्यावेळी तिघांनी मिळून राजूला झाडावर जोरात आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी सोनू गव्हाणे याने मृत राजूचा मृतदेह मोटारसायकलवर बसवून थेट गौतमनगर येथील त्याच्या घरी आणला. मृतदेह घरासमोर सोडून तो एका मित्रासह तेथून निघून गेला. यानंतर राजूचे वडील किसन वंजारी यांनी त्याची नाडी आणि श्वास तपासला असता कोणतीही हालचाल नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजूला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीतून कारवाई करून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत राजू वंजारी यांच्या पश्चात पत्नी, तीन अपत्ये, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
Aurangabad,Maharashtra
Jul 02, 2026 10:07 AM IST
