राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा


मुंबई : राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन मनसेप्रमख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच, एका पक्षातून (Shivsena) फुटून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार-खासदारांनाही त्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर, आता भाजप आमदार राम कदम (Ram kadam) यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन पलटवार केला असून यात हक्कभंग होऊ शकतो, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.  

ठाकरे गटातील फुटीर खासदार-आमदारांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच. भविष्यात या सगळ्याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन आमदार राम कदम यांनी पलटवार केला आहे.  

राज ठाकरेंचे विधान आहे, त्यात हक्कभंग होऊ शकतो, त्यांचे विधान विशेषाधिकाराचे हनन करणारे आहे. मनात त्यांच्याबद्दल आदर आहे, मी हक्कभंग टाकणार नाही, मात्र विधान तसं आहे, असे म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावरुन केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलंय. राज ठाकरेंचा छळ उद्धव ठाकरेंनी केला, म्हणून त्यांनी पक्ष सोडला. उद्धव ठाकरेंनी परिस्थिती निर्माण केली म्हणून पक्ष सोडावा लागला होता. स्वत:चं घर सांभाळता येत नाही, यात भाजपचा संबंध येतो कुठे? असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला आहे.  

लोकांना रोष वाटला असता तर ते पडले असते

राज ठाकरेंच्या विधानावर हक्कभंग प्रस्ताव येऊ शकतो, 20-20 लाख लोकांमधून निवडून येणारी लोकं पक्ष बदलतात याचे काही कारण असेल की नसेल. कोणता कॅबिनेट मंत्री सोडून गेला असं कुठे झालं आहे का कधी? एकनाथ शिंदेंसोबत गेले होते ते परत निवडून आलेत ना. लोकांना रोष वाटला असता तर ते पडले असते. खासदार आत्ता आलेत तर एकाचा फेल्युअरचा रेट दाखवा ना, असे देखील राम कदम यांनी म्हटले.  

उद्धव ठाकरेंच्या पापाची फळं

भाजपकडे 137 आमदार आहेत, आमचे आमदार खासदार वाढत आहेत, भाजप दिवसेंदिवस मोठा पक्ष होतोय, आकड्यांवरुन दिसतंय ना. त्यामुळे, ह्या विधानांचा भाजपशी संबंध नाही, त्यांनी सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा, जवळचे लोक का सोडून जात आहेत. जवळची माणसं सोडून जात असतील तर स्वभाव बदलला पाहिजे, उद्धव ठाकरे यांच्या पापाची फळं त्यांना मिळत आहेत, अशा शब्दात राम कदम यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. 

राज ठाकरेंची भाजपवर जळजळीत टीका

दरम्यान, उद्या सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टींचा त्रास होईल. आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचं, याला मर्यादा आहेत की नाही? ज्या ज्या वेळेला जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना संपावले आहे,  त्यावेळी त्यांच्यातूनच दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवले आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरु झाली आहे. तुम्ही बाहेरचे विरोधी पक्ष संपवणे हे सोडून द्या, पण तुमच्यात विरोधक निर्माण झालेत, तुम्हाला त्रास होईल तो तुम्हीही बघून घ्याल. हा जगाचा इतिहास आहे. आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं, अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा उलटा बंगला आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा काहीही म्हणा. पण भाजप आज मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही. आता जे राजकारण खेळताय, ते तुमच्याशी अंगाशी येणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा

सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *