तरुणीवर 17 वर्षे अत्याचार करणाऱ्या पुण्याच्या भोंदूबाबा नवा कारनामा समोर; आता दाखल झाला हा गुन्हा | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

एका तरुणीवर सलग १७ वर्षे लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा राधामोहन मिश्राच्या अडचणीत आता आणखी मोठी भर पडली आहे

त्या बाबाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
त्या बाबाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

पुणे: एका तरुणीवर सलग १७ वर्षे लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा राधामोहन मिश्राच्या अडचणीत आता आणखी मोठी भर पडली आहे. या ढोंगी बाबाच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपता संपेना अशी झाली आहे. आता पुण्याच्या खराडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी एक नवीन गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी या बाबावर एका तरुणीवर सलग १७ वर्षे आपल्या अनुयायांसमोरच अत्याचार करून तिला करंट देत तसेच मूत्र पाजत छळ केल्याचा आरोप आहे. आता पुन्हा या बाबावर नवा गुन्हा दाखल झाला आहे.

या नवीन प्रकरणात भोंदूबाबा राधामोहन मिश्र (वय ४८) याच्यासह तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ईशान राजन कक्कर (वय ३५, रा. सेंट्रल चौक, नांदे, ता. हवेली) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवीन तक्रारीनुसार, सामाजिक उद्दिष्टाच्या नावाखाली तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जागेतील हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या भोंदूबाबानं केला. त्यांना तिथून हाकलून लावण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत करून भयंकर कृत्य केले.

आरोपींनी तक्रारदाराला लाकडी दांडक्याने पाठीवर आणि पोटावर बेदम मारहाण केली. मारहाण करण्यासोबतच त्यांना जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची थेट धमकी देण्यात आली.

नेमका वाद काय होता?

तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी संगनमत करून तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक उद्दिष्टाच्या नावाखाली जातीयदृष्ट्या बदनाम केल्याचा राग मनात धरला. याच रागातून ४ जुलै रोजी आरोपींनी एकत्र येत तक्रारदाराच्या जागेतील हिस्सा काढून घेण्याचा आणि त्यांना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना बेदम मारहाण केली.

अटकेनंतर तक्रारदार आले पुढे

सलग १७ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा राधामोहन मिश्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर, या पीडित तक्रारदाराने हिंमत दाखवत पुढे येत पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी भोंदू मिश्रासह इतर आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. या नव्या गुन्ह्यामुळे भोंदूबाबाच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/

तरुणीवर 17 वर्षे अत्याचार करणाऱ्या पुण्याच्या भोंदूबाबा नवा कारनामा समोर; आता दाखल झाला हा गुन्हा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *