ICC T20I Player Rankings Latest : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी पुरुषांची टी-20 रँकिंग जाहीर केली असून फलंदाजांच्या यादीत मोठा तख्तापलट पाहायला मिळाला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आता जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज बनला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेत अभिषेक शर्माकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावून घेतला आहे. इशानच्या खात्यात सध्या 876 रेटिंग गुण आहेत, तर अभिषेक 869 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा जवळपास 12 महिने अव्वल स्थानावर होता, परंतु इशानने संघात पुनरागमन केल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत त्याचे सिंहासन हलवले.
इशानचे पुनरागमन अन् आयर्लंड दौरा (Ishan Kishan ICC T20I Player Rankings Latest)
इशान किशनने दोन वर्षे भारतीय संघाबाहेर राहिल्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. पुनरागमन केल्यानंतर गेल्या काही महिन्यांत त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या आयर्लंड दौऱ्यावर त्याला विशेष काही करता आले नाही. या दौऱ्यात त्याने एका सामन्यात 1 धाव तर दुसऱ्या सामन्यात 12 धावा केल्या. दुसरीकडे, अभिषेक शर्माने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 49 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या सामन्यात तो गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. या मालिकेत भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 0-2 असा ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला.
इशानची खास क्लबमध्ये एन्ट्री
या कामगिरीसह इशान किशनने एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तो भारताचा चौथा पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. इशान आणि अभिषेक यांच्या आधी केवळ विराट कोहली आणि सूर्याकुमार यादव यांनीच हा पराक्रम केला आहे. सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाबाहेर असून त्याच्याकडून कर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे. तो आता क्रमवारीत एक स्थान घसरून आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या टॉप-10 टी-20 फलंदाजांमध्ये भारताचे चार खेळाडू आहेत. युवा फलंदाज तिलक वर्मा सहाव्या क्रमांकावर कायम असून त्याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, भारताविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयर्लंडच्या खेळाडूंना रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि फलंदाज लॉर्कन टकर चार स्थानांची सुधारणा करत 77 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर रॉस एडेअर सहा स्थानांची झेप घेत 84 व्या क्रमांकावर आला आहे. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीजने मालिकेत चार बळी घेतले, ज्यामुळे तो 25 व्या क्रमांकावर (एक स्थान वर) आला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग ठरली आहे. गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खान जगातील नंबर-1 गोलंदाज म्हणून कायम आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला