अपघात की घातपात? जालन्यात भरधाव कारने तलाठ्याला चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO समोर | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स भागामध्ये एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.

talathi accident jalna news
talathi accident jalna news

जालना शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स भागामध्ये एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या थरारक अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तलाठ्याला कारने अक्षरशः चिरडलं असून, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या भीषण अपघाताचा ‘सीसीटीव्ही’ व्हिडीओ समोर आला असून, हा अपघात किती भयानक होता याची दाहकता त्यात स्पष्टपणे दिसत आहे. तसेच रस्त्यावर उभा राहिलेल्या तलाठ्याला अशाप्रकारे उडवल्याने हा अपघातच आहे की घातपात? याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत असलेले तलाठी दिगंबर कुरेवाड हे आपले कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जाण्यासाठी निघाले होते. मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसराजवळ ते रस्त्याच्या कडेला उभे असताना, एका अनियंत्रित आणि भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कुरेवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कार चालकावर गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाने आणि अतिवेगाने कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संबंधित कार चालका विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा घडलेल्या या थरारक आणि भीषण अपघातामुळे जालना शहरात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तलाठी कुरेवाड हे आपल्या दुचाकीह रस्त्याच्या कडेला उभं असल्याचं दिसत आहे. याचवेळी पाठिमागून वेगात आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. यानंतर कुरेवाड हे हवेत उडून रस्त्याच्या बाजुला पडले. तर कारही रस्ता सोडून शेतात शिरली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *