Last Updated:
अयोध्या येथील भव्य राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तपास आता वेगाने केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अयोध्या: अयोध्या येथील भव्य राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तपास आता वेगाने केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पकडले जाण्याच्या भीतीने चोरी केलेली रोकड मंदिर परिसरातून बाहेर नेण्यापूर्वी काही काळ टॉयलेटमध्ये लपवून ठेवली जात होती, अशी कबुली एका आरोपीनं तपासादरम्यान दिली आहे.
न्यायालयाच्या परवानगीनंतर विशेष तपास पथकाने (SIT) अटक केलेला आरोपी अविनाश शुक्ला याची सुमारे दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने करोडो रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच दान चोरीचा हा सगळा कट कसा रचला जायचा, याची संपूर्ण माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीतील पैशांची मोजणी सुरू असतानाच चोरीचा हा खेळ चालायचा. मोजणी करत असताना एक जण हळूच कॅश बाजूला काढायचा, तर इतर आरोपी त्याला अशा प्रकारे घेरून उभे राहायचे जेणेकरून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात काहीही दिसणार नाही. आरोपींना मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अचूक लोकेशनची माहिती होती, त्यामुळे ते कॅमेऱ्यांची नजर सहज चुकवायचे. चोरलेले पैसे आधी टॉयलेटमध्ये लपवायचे आणि नंतर संधी मिळताच ते पैसे टॉयलेटमधून काढून घ्यायचे आणि आरामात मंदिर परिसरातून बाहेर नेले जायचे.
अनिल मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप
तपास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश शुक्ला याने दावा केला आहे की, या संपूर्ण मोजणी प्रक्रियेत अनिल मिश्रा यांची मुख्य भूमिका होती. ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने आरोपींची जास्त तपासणी किंवा संशय घेतला गेला नाही.
दरम्यान, अनिल मिश्रा आणि श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी गेल्या आठवड्यातच आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. एसआयटीने (SIT) यापूर्वीच या दोघांची चौकशी केली आहे. मात्र, या घोटाळ्यात या दोघांचा थेट सहभाग होता की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून तपास सुरू आहे.
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
राम मंदिराच्या दानपेटीतील कोट्यवधींचे बंडल टॉयलेटमध्ये, CCTVलाही द्यायचे चकवा, कसा मारायचे डल्ला? आरोपीनं सांगितली A to Z स्टोरी
