पुणे : पैशाचं पाकिट पीएमपीमध्येच विसरली महिला; घरी जाताच बसला धक्का, चालकानं जे केलं थक्क करणारं! | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

एका महिला प्रवाशाचं रोख रक्कम आणि घराची चावी असलेलं पाकिट पीएमपीमध्येच विसरलं. ही महिला घरी पोहोचताच तिच्या ही बाब लक्षात आली आणि पायाखालची जमीनच सरकली.

पैशाचं पाकिट पीएमपीमध्ये विसरलं (फाईल फोटो)
पैशाचं पाकिट पीएमपीमध्ये विसरलं (फाईल फोटो)

पुणे: पुण्यातून एक वेगळीच घटना समोर आली. अनेकजण दररोजच्या प्रवासासाठी सोपा आणि परवडणारा पर्याय म्हणून पीएमपीने प्रवास करत असतात. मात्र, काहीवेळा घाईगडबडीत बसमधून उतरताना आपली एखादी वस्तू बसमध्येच सुटते. अशावेळी ती परत मिळण्याची शक्यता अगदीच धुसर असते. मात्र, आता समोर आलेली ही घटना नक्की वाचा. यात एका महिला प्रवाशाचं रोख रक्कम आणि घराची चावी असलेलं पाकिट पीएमपीमध्येच विसरलं. ही महिला घरी पोहोचताच तिच्या ही बाब लक्षात आली आणि पायाखालची जमीनच सरकली.

वारजे गणपती माथा येथील रहिवासी असलेल्या सुनीता नेताजी यावे या कर्वे पुतळा येथून गणपती माथा दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. प्रवास संपवून त्या सुखरूप घरी पोहोचल्या. मात्र, घरात जाण्यापूर्वीच त्यांच्या लक्षात आले की, ८,७०० रुपयांची रोख रक्कम आणि घराच्या कुलपाची चावी असलेले छोटे पाकीट बसमध्येच राहिले आहे. कष्टाचे पैसे हरवल्याने प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने गणपती माथा बस स्थानक गाठले. तेथे ड्युटीवर असलेले ‘स्टार्टर’ हरिश्चंद्र तांदळे यांच्याकडे जात त्यांनी रडत रडत आपली आपबिती सांगितली.

महिला प्रवाशाची ती अवस्था पाहून स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांनी जराही वेळ वाया न घालवता तातडीने हालचाली सुरू केल्या. तांदळे यांनी सुनीता यांच्याकडील बस तिकीट क्रमांक तपासून संबंधित बस नेमकी कुठे आहे याचा शोध घेतला. त्यांनी तातडीने एनडीए गेट क्रमांक १० चे ‘स्टार्टर’ राजाभाऊ ओव्हाळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि बस तपासण्यास सांगितले. ती बस एनडीए गेटवर पोहोचताच ओव्हाळ यांनी चालक गणेश कदम आणि वाहक गणेश बारवकर यांच्या मदतीने बसची तपासणी केली आणि पाकीट सुखरूप ताब्यात घेतले.

अवघ्या १५ मिनिटांत ती बस जेव्हा पुन्हा गणपती माथा येथे परतली, तेव्हा चालक, वाहक आणि स्टार्टर यांच्या उपस्थितीत सुनीता यावे यांना त्यांचे पाकीट सुखरूप परत करण्यात आले. पाकिटातील सर्व पैसे आणि चावी जशीच्या तशी पाहून भावुक झालेल्या सुनीता यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले. पीएमपी चालक गणेश कदम, वाहक गणेश बारवकर, स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे आणि राजाभाऊ ओव्हाळ यांनी दाखवलेल्या या कर्तव्यदक्षतेमुळे सध्या संपूर्ण पुण्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे एक अनोखे उदाहरण पेश केले आहे. कर्मचाऱ्यांच्या  या कौतुकास्पद कामगिरीमुळे प्रवाशांचा पीएमपी प्रशासनावरील विश्वास अधिकच वाढला आहे.

मराठी बातम्या/पुणे/

पुणे : पैशाचं पाकिट पीएमपीमध्येच विसरली महिला; घरी जाताच बसला धक्का, चालकानं जे केलं थक्क करणारं!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *