राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. दरम्यान त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
परंतु जरी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी दुसरीकडे मात्र गोकुळ गीते यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत, आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. गोकुळ गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा नरेंद्र दराडे यांना बसण्याची शक्यता होती. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी सातत्याने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. अखेर समोर आलेल्या माहितीनुसार गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या प्रयत्नाला आता यश आलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गिते हे आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार आहेत. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या जागेवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान आता नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश आल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे. गीते यांनी पाठिंबा दिल्यानं दराडे यांचा विधान परिषद निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. शिवसेनेसोबतच दराडे यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.