मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर उद्या 15 जूनपासून राज्यातील सर्वच शाळा सुरू होत असून गावागावात शाळेची (School) घंटा वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्या दिवशी शाळेत जाऊन करणार विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. पनवेलच्या वहाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत आपला वेळ घालवणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे हजेरी लावणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे जिल्ह्यातील शाळेत हजर राहतील. मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे 15 जून रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पीएम श्री योजनेअंतर्गत विकसित होत असलेली ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक शैक्षणिक सुविधा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष ओळख निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण करणे, शाळेप्रती आपुलकी वाढविणे आणि प्रत्येक बालकाचा शाळेत आनंददायी प्रवेश सुनिश्चित करणे हा या प्रवेशोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येणार असून, त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांकडून स्वागतगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज ते मुंबईकडे रवाना झाले.जाण्यापूर्वी 105 गावातील दुर्गम भागात असणाऱ्या पाचवी ते दहावीचे शिक्षण घेणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 250 विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करून मुलांनी शिक्षणामध्ये गावाचे नाव उज्वल करावे, असा मौलिक सल्ला दिला आहे. सायकल हाती मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. या दुर्गम कांदाटी आणि कोयना विभागातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर शाळेसाठी पायी प्रवास करताना खूप यातना सहन कराव्या लागतात.हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ 105 गावातील विद्यार्थ्यांना सायकल वाटपचा निर्णय घेतला आणि या पहिल्या टप्प्यातील 250 सायकलींचे वाटप आज करण्यात आले.
हेही वाचा
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप