Last Updated:
Ayodhya Ram Temple Donation Case: राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्रस्टवर गंभीर आरोप करत आपण दिलेली 1.11 लाख रुपयांची देणगी परत मागणार असल्याची घोषणा केली.
अयोध्या: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जोरदार टीका केली आहे. भोपाल येथे महिला काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी आणि उज्जैनमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात पदयात्रा काढण्याची घोषणा केली.
ही पदयात्रा उज्जैन ते अयोध्या अशी असेल आणि ती राजकीय स्वरूपाची नसेल. यात्रा 2 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिग्विजय सिंह यांनी दावा केला की राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांची देणगी दिली होती. मात्र त्या देणगीचा कथित अपहार झाल्याचा आरोप करत त्यांनी ती रक्कम परत मिळावी, यासाठी अयोध्येतील न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, मी दिलेल्या देणगीचा अपहार झाला आहे. माझे पैसे लुटले गेले आहेत. त्यामुळे ती रक्कम मला परत मिळावी, जेणेकरून मी ती रामालय ट्रस्टमध्ये जमा करू शकेन. मला पोलिसांवर विश्वास नाही. पोलीस भाजपच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात जाणार नाही. मी थेट न्यायालयात जाईन.
राम मंदिरासाठी देणगी गोळा केली जात असताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यापेक्षा अधिक देणगी द्यावी, या उद्देशाने आपण 1 लाख 11 हजार रुपये दिले होते,असे दिग्विजय सिंह म्हणाले.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून माझी देणगी ट्रस्टमध्ये जमा होईल, याची खात्री करण्याची विनंती केली होती. आम्ही स्वतः ती रक्कम जमा केली आणि त्याची अधिकृत पावतीही घेतली. आम्ही भगवान रामावरील श्रद्धा आणि भव्य मंदिर उभारण्याच्या उद्देशाने ही देणगी दिली होती, असे ते म्हणाले.
दिग्विजय सिंह यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावरही आरोप केले. आणीबाणीच्या काळात चंपत राय नागपूरला गेले आणि तेथे प्रचारक झाले. त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेत पुढे आले. अशोक सिंघल यांनी त्यांना सोबत घेतले. त्यानंतर पुन्हा देणगी संकलन सुरू झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रस्टची स्थापना झाली आणि चंपत राय यांच्याकडे त्याचे व्यवस्थापन सोपविण्यात आले. या ट्रस्टमध्ये कोणतेही महात्मा किंवा शंकराचार्य नाहीत.
चंपत राय यांच्याकडे ट्रस्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. त्यांनी 10 ते 15 हजार रुपये मासिक वेतनावर कर्मचारी नियुक्त केले. मात्र तरीही दररोज जमा होणाऱ्या देणगीतून 10 ते 20 टक्के रक्कम रोख स्वरूपात गायब होत होती. या प्रकारात काही बँक अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी होते. हा आमच्या श्रद्धेवर झालेला अत्यंत मोठा आघात आहे, असा दिग्विजय सिंह यांनी आरोप केला.
तेव्हापासून देणगी चोरीचे प्रकार सुरू झाले. आम्हीही देणगी दिली. गावागावातून राम मंदिरासाठी विटा पाठविण्यात आल्या, पण आजतागायत त्यांचा पत्ता लागलेला नाही. लोकांमध्ये भ्रम निर्माण करून, धर्माचा वापर करून काही लोक पैसा कमावत आहेत. त्या पैशातून मते विकत घेतली जातात, आमदार आणि खासदार विकत घेतले जातात. ही खरेदी आमच्यासारख्या श्रद्धेने देणगी देणाऱ्या लोकांच्या पैशातून होत आहे. आता ही देणगी चोरी नेमकी कोण करत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान दिग्विजय सिंह यांनी केलेल्या या आरोपांमुळे राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 03, 2026 10:06 PM IST
‘राम मंदिरासाठी मी दिलेली देणगी परत हवी’, माजी मुख्यमंत्र्यांनी दिली कोर्टात जाण्याची धमकी; गैरव्यवहार प्रकरणात खळबळजनक वळण
