याद राखा, संयम सुटल तर तुमच्या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा ‘पेपर’ फाडल्याशिवाय… ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा – Marathi News | Amit Thackeray criticized the Maharashtra government over the TET paper leak demanding strict action


‘NEET’ परीक्षेचा घोटाळा समोर आल्यानंतर त्या पाठोपाठ लगेचच ‘TET’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. परिक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे लक्षात येताच ही परिक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे अमित ठाकरेंची पोस्ट?

अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे टीईटीचा पेपर लीक झाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टच्या सुरुवातीला, परवा मध्यरात्री भिवंडीत पोलिसांनी छापा टाकला आणि आज होणारा ‘TET’ परीक्षेचा पेपर फुटल्याचं सिद्ध झालं. परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींचं काय? परीक्षा म्हणजे उमेदवारांची योग्यता ओळखण्याची संधी असायची, पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील ‘संधीसाधूंनी’ परीक्षा हा ‘प्रश्नपत्रिका विकण्याचा ‘अधिकृत धंदा’ बनवला आहे! देशात गाजलेल्या ‘NEET’ परीक्षेचा घोटाळा असो, की महाराष्ट्रातील ‘MHT-CET’ चा निकाल, ज्या मुलांना १० वी-१२ वीत साधे पासिंग मार्क्स मिळाले होते, ती मुलं चक्क १०० पर्सेन्टाईल मिळवून टॉपर येतात! हा कोणता चमत्कार? ज्या राज्याला शिक्षणाचा वारसा आहे, तिथे १२ वीच्या परीक्षेत ड्रोन लावून कॉपी रॅकेट पकडावं लागतं आणि १०७ केंद्र ब्लॅकलिस्ट करावी लागतात, ही आहे का महाराष्ट्राची प्रगती? तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी… तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीये का??? असे म्हटले आहे.

पुढे त्यांनी, मला सरकारला आणि शिक्षण खात्याला विचारायचं आहे, तुम्ही जे पेपरफुटी विरोधी कडक कायदे आणण्याच्या पोकळ बाता मारता, ते कायदे काय फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का? मंत्रालयाच्या आशीर्वादाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मुख्य सुत्रधारांना अटक नक्की होणार तरी आहे का? की दरवेळीप्रमाणे “आम्ही चौकशी समिती नेमलीये” हा नेहमीचा गुळगुळीत डायलॉग पुढे करून तुम्ही मोकळे होणार आहात? आज गरीब आणि मध्यमवर्गीय घरातला तरुण दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून अभ्यास करतोय. त्याची चूक एवढीच, की तो लाच देऊन पेपर विकत घेऊ शकत नाही! सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय… आणि सरकार मात्र ‘ऑपरेशन टायगर’ करण्यात मग्न आहेत! किमान आता तरी तुमचं हे घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या त्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका असे म्हटले आहे.

सरकारला इशारा..

पोस्टच्या शेवटी अमित ठाकरे यांनी, लक्षात ठेवा, जर या तरुणांचा संयम सुटला ना, तर तुमच्या या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा ‘पेपर’ फाडल्याशिवाय राहणार नाहीत! असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *