‘महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी’, PSI वरील गंभीर आरोपानंतर शिंदेंच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? | नाशिक बातम्या (Nashik News)


Last Updated:

जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री त्याच्यांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

News18
News18

विजय वाघमारे, प्रतिनिधी चाळीसगाव: जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री त्याच्यांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध जाहीर भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याची माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर एका प्रकरणात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी तेथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोप करत असताना उन्मेष पाटील यांनी पीएसआय घुले यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक, अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप

आपल्या जाहीर भाषणात उन्मेष पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. पीएसआय घुले हे निष्पाप तरुणांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत आहेत. तसेच ते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडेच शरीरसुखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी जाहीर भाषणातून केला. हे आरोप करताना उन्मेष पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्याला थेट शिवीगाळ केली. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

पोलिसांच्या गोपनीय शाखेकडून तक्रार, BNS अंतर्गत गुन्हा

जाहीर भाषणात पोलीस अधिकाऱ्याची बदनामी आणि शिवीगाळ केल्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३५२ आणि ३५६(३) अंतर्गत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याविरोधात अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *