रत्नागिरी : राज्यात मुंबईसह विविध जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, अनेक नद्यांना पूर आला असून धरणेही भरली जात आहेत. कोकणातही पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीलाही पूर आला आहे. दरम्यान, बुधवारी 22 जुलै रोजी (सायंकाळी ६:३१ वाजता) मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक भरधाव वेगाने येत असताना नियंत्रण सुटून जगबुडी नदीत (River) कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली होती. पुलावरून सुमारे 100 फूट खाली नदीत पडलेला ट्रक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जवळपास 400 मीटरपर्यंत वाहून गेला. या अपघातात ट्रकचा चालक वाहनातच अडकून पडला होता.
जगबुडी नदीच्या पुलावरील अपघाताच्या या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, नदीचा वेगवान प्रवाह, खोल पाणी आणि ट्रकचे अवघड स्थान यामुळे चालकापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर आज बचाव पथकाने अथक प्रयत्न करत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत चालकाची ओळख व अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. याप्रकरणी, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हायवाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
बीडच्या केजमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. केजच्या भवानी चौकात धारूर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याला चिरडल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीहून जात असलेल्या नितीन आदिनाथ चाटे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याने घटनास्थळी मन हेलावणारे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, घटनेनंतर अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये रामसेतू पुलावरुन धोकादायक प्रवास
नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. रामकुंड परिसरातील सर्व मंदिरा पाण्याखाली गेली असून राम सेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे. याच रामसेतू पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना एक नागरिक जीव धोक्यात घालून पूलावरून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडेल अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया