Heart Health: रोजची कामं करताना ‘ही’ चार लक्षणे दिसली तर चुकुनही दुर्लक्ष करू नका, ‘हार्ट फेल्युअर’चा सर्वाधिक धोका, तातडीने डॉक्टरांकडे जा


Heart Helth: ‘क्रॉनिक हार्ट फेल्युअर’ ही एक दीर्घकालीन स्थिती असून त्यात हृदय कार्य करत राहते, परंतु शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा रक्तपुरवठा करण्यास ते असमर्थ ठरते. हा आजार प्रगतशील स्वरूपाचा असतो; म्हणजेच तो स्थिर न राहता काळानुसार बदलत जातो. या आजाराची वाटचाल परिवर्तनशील असते: काही काळ रुग्णांची स्थिती स्थिर राहते, तर काही वेळा लक्षणे अचानक बळावतात. परिचित लक्षणे बदलू लागतात म्हणजे ती अधिक वारंवार किंवा तीव्र होतात किंवा दैनंदिन कामांमध्ये अडथळा आणू लागतात. तेव्हा ती लक्षणे ‘हार्ट फेल्युअर’ (हृदय निकामी होण्याची स्थिती) बळावत असल्याचे संकेत असू शकतात. उदाहरणार्थ, पूर्वी सहज वाटणारी चाल आता दमछाक करणारी ठरू शकते, पायऱ्या चढल्यानंतर पूर्वस्थितीत येण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो किंवा घोट्यांवर नेहमीपेक्षा जास्त सूज दिसू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लक्षणे गंभीर होण्याची वाट पाहण्याऐवजी त्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांमधील बदल वेळीच ओळखणे महत्वाचे असते. याबद्दल  मुंबईतील देसाई हार्ट केअर क्लिनिकचे सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूपेन एन. देसाई, एमबीबीएस, एमडी (मेडिसिन), यांनी मार्गदर्शन केले आहे.

खालील चार चिन्हावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे

१. दैनंदिन कामे करणे कठीण होते

जी कामे तुम्ही पूर्वी सहजपणे करत होतात, ती करताना आता तुमचा श्वास फुलू लागतो. पायऱ्या चढणे, बाजारापर्यंत चालत जाणे किंवा खरेदीच्या पिशव्या उचलणे अशा गोष्टींसाठी पूर्वीपेक्षा जास्त कष्ट पडू लागतात. पूर्वी सहजपणे केल्या जाणाऱ्या कामांदरम्यान श्वास जास्त फुलणे किंवा शारीरिक हालचाल करण्याची क्षमता कमी होणे, ही लक्षणे आजार बळावत असल्याचे दर्शवू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्वी जवळच्या दुकानापर्यंत सहज चालत जात होतात पण आता श्वास घेण्यासाठी तुम्हाला वाटेतच थांबावे लागत असेल तर या बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

२. पूर्ववत होण्यास अधिक वेळ लागणे

शारीरिक श्रमानंतर पुन्हा सामान्य स्थितीला येण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, याचा विचार करा. शारीरिक हालचालींनंतर अधिक थकवा जाणवणे किंवा पूर्ववत होण्यास जास्त वेळ लागल्यास तुमची शारीरिक स्थिरता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. शरीराला पूर्वस्थितीत येण्यास अधिक वेळ लागतो, तेव्हा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हृदयाला अनेकदा गरजेपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात.
थकव्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु तुमच्या नेहमीच्या ऊर्जा पातळीत झालेला सततचा बदल, विशेषतः हृदय निकामी झाल्याची इतर लक्षणेही असताना दुर्लक्ष करू नये.

३. शरीरात द्रव साचणे-

हृदय निकामी होण्याच्या स्थितीमुळे शरीरात द्रव साचू शकतो. घोट्यांवर वाढणारी सूज आणि द्रव साचल्यामुळे होणारी वजनवाढ यांकडे लक्ष द्या कारण ही लक्षणे हृदय निकामी होण्याची स्थिती बळावत असल्याचे दर्शवतात. तुम्हाला असे जाणवू शकते की तुमचे बूट घट्ट होत आहेत, मोज्यांमुळे घोट्याभोवती खोल वळ उमटत आहेत किंवा द्रव साचल्यामुळे वजन वाढत आहे. तुमच्या डॉक्टरांनी नियमितपणे वजन तपासण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करा आणि वजनातील चिंताजनक बदलांबाबत त्यांच्याशी चर्चा करा.

४. इतर लक्षणे दिसू लागतात किंवा अधिक गंभीर होतात –

चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे, मळमळ, भूक कमी होणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे ही सर्व लक्षणे दीर्घकालीन हृदयविकारासोबत असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना इतर कारणांमुळे झाले आहे असे समजणे सोपे असते परंतु नवीन किंवा अधिक गंभीर होणाऱ्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे विविध कारणांमुळे उद्भवू शकतात आणि केवळ त्यांच्यावरूनच ‘हार्ट फेल्युअर’ची स्थिती बळावत आहे, असे मानणे आवश्यक नाही. परंतु ही लक्षणे नवीन असतील, वारंवार किंवा अधिक तीव्रतेने जाणवत असतील, अथवा त्यासोबत श्वास घेण्यास अधिक त्रास होणे, थकवा किंवा शरीरावर सूज येणे यांसारखे त्रास होत असतील, तर त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करावी.

लवकर कृती करणे का महत्त्वाचे आहे?

क्रॉनिक हार्ट फेल्युअरमध्ये लक्षणे स्थिर वाटत असली तरीही सतत काळजी घेणे आवश्यक असते. प्रकृती खालावण्याचा प्रसंग महत्त्वाचा असतो कारण ज्या लोकांना नुकताच असा अनुभव आला आहे, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडण्याचा धोका जास्त असतो. बदल लवकर ओळखणे आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणे वेळेवर हस्तक्षेप करण्यास मदत करू शकते. तुमची औषधे आणि पाठपुराव्यासाठीच्या भेटी नियमितपणे सुरू ठेवा, होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा आणि यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. योग्य त्या ठिकाणी उपचारांच्या नवीन पद्धतींसह वेळेवर आणि योग्य उपचार घेतल्यास या स्थितीचे व्यवस्थापन करण्यास आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *