मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही… अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, पुण्यात काय घडलं? – Marathi News | Bjp leader abhimanyu pawar medha Kulkarni row over seating at pune sarthi event


पुण्यात भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्याची घटना समोर आली आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. सारथीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे खासदार मेधा कुलकर्णी रागात कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यात काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसण्यासाठी इच्छुक होत्या, मात्र याचवेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं म्हटल्याचे समोर आले आहे. पवार यांच्या विधानामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी या तडकाफडकी निघून गेल्या. त्यामुळे या कार्यक्रमाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले अभिमन्यू पवार…

या कार्यक्रमानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. पवार यांनी म्हटले की, ‘ताईंचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना एवढेच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण, ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू मी त्यांना एवढेच बोललो आहे, यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही, मी ताईंना देखील विनंती करतो की, मी काय बोललो ते तुम्ही आठवून बघा. हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत. त्यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमातून निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय आहे.’

मेधा कुलकर्णींचे स्पष्टीकरण

या प्रकरणावर बोलताना मेधा कुलकर्णी यांनी म्हटले की, नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्यावं अशी माझी इच्छा होती. मात्र अभिमन्यू पवार यांना असं वाटत होतं की ते स्वत: पुढे बसतील. हा कार्यक्रम मराठा समाजातील अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या सारथी संस्थेचा होता. मला वाईट वाटतं की, माझ्या जातीला चुकीच्या पद्धतीने ट्रीट करून गालबोट पवार यांनी लावलं. ते म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही पुढे बसू नका, कारण त्यामुळे वाद होईल. खुर्च्या रिकाम्या असल्याने अधिकारी मला म्हणत होते की मी पुढे बसतो, ताईंना पुढे बसवायला नको की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे. त्यामुळे फक्त मराठा समाजाचे लोक पुढे बसतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *