पुणे : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड (Pune) हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचार किंवा हल्ल्यासंदर्भातील दुसरी बाजू समोर आल्याचं बोललं जात आहे. आपल्या प्रियकरासोबत कट रचून होणाऱ्या नवऱ्याला निर्दयीपणे संपवल्याच्या गुन्ह्यात आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी, पुणे पोलिसांनी (Police) कसून चौकशी सुरू केली असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आता आपला मोर्चा आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाकडे वळवला असून थेट सियाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्या आले आहे. दुसरीकडे आपल्या मुलाच्या न्यायासाठी अग्रवाल (ketan agrawal) कुटुंबीय मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले आहे.
लोहगड येथे लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.
फास्टट्रॅक कोर्ट, उज्ज्वल निकमांची नियुक्ती
या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.
सियावर दबाव नव्हता, वडिलांची प्रतिक्रिया
दरम्यान, दुसरीकडे आपल्या मुलीने केलेल्या कृत्यामुळे जबर धक्का बसलेले सियाचे वडील अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालच त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) बाहेर काढून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. जनरल वॉर्डमध्ये येताच सियाच्या वडिलांनी माध्यमांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, ज्यावरून सियाच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. सियावर या लग्नासाठी घरून कोणतेही प्रेशर (दबाव) नव्हते. तिने स्वतःच्या मर्जीनेच केतनला पती म्हणून पसंत केले होते. जेव्हा केतन अग्रवालचे स्थळ त्यांच्याकडे आले, तेव्हा सिया प्रचंड आनंदी होती. तिने सुरुवातीला केतनला फोटोमध्ये पाहिले आणि तो तिला आवडला, असे सियाच्या वडिलांनी म्हटले.
हेही वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!