Last Updated:
भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी पूर्वी लागू करण्यात आलेली एक मोठी सक्ती प्रशासनाने तात्काळ प्रभावाने रद्द केली आहे. आता भक्तांना कोणत्याही त्रासाशिवाय थेट विनामूल्य दर्शन घेता येणार आहे
पुणे: जर तुम्ही बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनाचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आहे. भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी पूर्वी लागू करण्यात आलेली एक मोठी सक्ती प्रशासनाने तात्काळ प्रभावाने रद्द केली आहे. आता भक्तांना कोणत्याही त्रासाशिवाय थेट विनामूल्य दर्शन घेता येणार आहे. इतकेच नाही, तर ज्यांना तातडीने आणि रांगेत न उभे राहता व्हीआयपी पद्धतीने दर्शन हवे आहे, त्यांच्यासाठीही प्रशासनाने एक ‘खास’ सुविधा आणली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील घोषणा केली.
भीमाशंकर मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने यापूर्वी केवळ ‘ऑनलाइन पास’ असलेल्या भाविकांनाच दर्शनाची अट घातली होती. मात्र, भाविकांची वाढती गर्दी आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज, गुरुवारपासून ही पासची सक्ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे.
आता सर्व सामान्य भाविकांना कोणतीही फी किंवा पास न काढता थेट विनामूल्य दर्शन घेता येईल. सकाळी ७ ते ११ या वेळेत भक्तांना थेट गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. तसेच दुपारची वेळ वाढवून ती १ वाजेपर्यंत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष वेधले आहे.
ज्या भाविकांना खूप घाई आहे आणि रांगेत वेळ वाया घालवायचा नाही, अशा भक्तांसाठी पुढील सोमवारपासून (२२ जून) ‘तत्काळ दर्शन’ सुविधा सुरू केली जात आहे. यासाठी भाविकांना प्रतिव्यक्ती २,५०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर हा व्हीआयपी दर्शनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भीमाशंकर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘भीमाशंकर हेरिटेज वसाहत’ या भव्य कामाची निविदा २५ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार असून जुलै अखेरपर्यंत याचे थेट कार्यादेश दिले जातील.
या संपूर्ण परिसराचे काम प्री-फॅब्रिकेशन तंत्रज्ञानाद्वारे केले जाईल. मंदिराचा मुख्य सभामंडप हा ‘बेसाल्ट दगडांमध्ये’ आणि प्राचीन हस्तकलेचा वापर करून साकारला जात आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, हे बांधकाम करताना कोणत्याही आधुनिक यंत्रांचा वापर केला जात नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आवर्जून सांगितले.
Pune,Maharashtra
भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी गूड न्यूज! दर्शनासाठीचा ‘तो’ नियम अखेर रद्द; तत्काळ दर्शनासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
