बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना


Beed : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पेरणीसाठी पैसे नसल्याने एका 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील कोरडेवाडीत घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये  हळहळ व्यक्त होत आहे. 

बॅंकेत वारंवार चकरा मारुन सुद्धा पीक कर्ज मिळालं नाही

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस सुरु आहे. शेतकरी पेरणीची लगबग करीत असताना केज तालुक्यातील बाबूराव सुभाष यादव वय – 26 वर्षे या शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे नसल्याने आणि बॅंकेत  वारंवार पीक कर्जासाठी चकरा मारुन सुद्धा पीक कर्ज मिळत नसल्याने सदरील शेतकऱ्याने नैराश्येतून शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळं नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण आहे. 

प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी

संबंधित शेतकऱ्याला वेळीच पीक कर्ज मिळाले असते तर अशी घटना घडली असती का? संबंधित शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोण?  असे संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत. या तरुण शेतकऱ्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *