पुणे: पंढरीच्या वारीसाठी (Pandharichi wari) मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून बुलढाण्यातून श्री संत गजानन महाराज यांची पालखी निघाली असून जळगावमधून संत मुक्ताईंची पालखीची देखील वारी सुरू झाली आहे. शासनानेही वारीची तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांसाठी सर्वोतोपरी सुविधा पुरवण्याबाबत आढावा बैठकही घेण्यात आली. यंदाच्या आषाढी (Ashadhi) एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक समतेची ओळख आहे. लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केले असून, त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. यावर्षी आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये या प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेला 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे आवश्यक प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पायी वारी सुरू, लवकरच पालख्यांचे प्रस्थान
गेल्या महिनाभरापासून वाट पाहत असलेला शेतकरी पावसाने हजेरी लावल्याने सुखावला असून काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासह, आषाढी वारीचे, पढरीच्या भेटीची ओढ देखील शेतकऱ्यांना लागून आहे. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. त्यासाठी, पायी वारीली सुरुवात झाली आहे. लवकरच देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल. त्याच पार्श्वभूमीवर शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. राज्य शासन वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन, संवर्धन आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वारीतील दिंड्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी