पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसला; जबरदस्तीने वॉशरूम वापरले, बाहेर येताच डिलिव्हरी बॉयने केलं नको ते कृत्य! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

बेंगळुरूमध्ये फ्लिपकार्टच्या एका डिलिव्हरी एजंटने पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18

बेंगळुरू: फ्लिपकार्टच्या एका डिलिव्हरी एजंटला महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विजय मल्लिकार्जुन कामत असे आरोपीचे नाव असून पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून त्याने गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा डिलिव्हरी एजंटांच्या पडताळणी आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

महिला ती घरात एकटीच असताना फ्लिपकार्टचा डिलिव्हरी एजंट पार्सल घेऊन आला होता. पार्सल दिल्यानंतर त्याने घरातील स्वच्छतागृह (वॉशरूम) वापरण्याची परवानगी मागितली. मात्र आपण त्याला वारंवार नकार दिला आणि शेजाऱ्यांकडे मदत मागण्याचा सल्लाही दिला, असे महिलेने सांगितले. तरीही आरोपीने तिचा नकार धुडकावून लावत चप्पल-बूट काढले आणि जबरदस्तीने फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे.

वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर अश्लील कृत्य

वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर आरोपीने स्वतःचे खासगी अवयव दाखवत अश्लील वर्तन केले. परिस्थितीचा अंदाज आल्याने महिलेने तत्काळ मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये आरोपीच्या पँटची झिप उघडी असल्याचेही दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फ्लिपकार्टची तत्काळ कारवाई

घटना समोर आल्यानंतर फ्लिपकार्टने अधिकृत निवेदन जारी केले. कंपनीने या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त करत ग्राहकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

कंपनीच्या म्हणण्यानुसार घटना समजताच संबंधित डिलिव्हरी पार्टनरची सेवा तात्काळ बंद करण्यात आली. तसेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केले जाईल, असे फ्लिपकार्टने सांगितले.

स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटले नाही

घटनेनंतर संबंधित महिलेने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती रडताना दिसत असून या घटनेनंतर आपण प्रचंड मानसिक धक्क्यात गेल्याचे तिने सांगितले. स्वतःच्या घरातच मला अपमानित, असुरक्षित आणि माझ्या सन्मानाचा भंग झाल्यासारखे वाटले, असे ती म्हणाली.

तिने फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरही प्रश्न उपस्थित करत, अशा प्रकारचे डिलिव्हरी एजंट कंपन्या कशा नियुक्त करतात? त्यांची योग्य पडताळणी केली जाते का? एका महिलेने स्पष्टपणे नाही म्हटल्यानंतर तिथेच विषय संपला पाहिजे. कोणालाही जबरदस्तीने घरात घुसण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

महिलेने सांगितले की, आरोपीच्या वागणुकीमुळे तिला भीती वाटू लागल्याने तिने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला आणि गरज पडल्यास मदत मागता यावी म्हणून घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 75, 79 आणि 329(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही अशाच घटना घडल्या

एप्रिल 2026: तिरुमलाशेट्टीहल्ली परिसरात 28 वर्षीय महिलेने शॅडोफॅक्स कंपनीच्या डिलिव्हरी एजंटवर मारहाण, लैंगिक छळ आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता. अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ झालेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. महिलेने आरोपीने कपडे ओढण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

ऑक्टोबर 2025: आरटी नगर परिसरात ब्लिंकिटच्या एका डिलिव्हरी एजंटला 21 वर्षीय ब्राझिलियन मॉडेलशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ऑर्डर देताना आरोपीने महिलेचा अयोग्य स्पर्श करून अश्लील वर्तन केल्याची तक्रार करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मराठी बातम्या/देश/

पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसला; जबरदस्तीने वॉशरूम वापरले, बाहेर येताच डिलिव्हरी बॉयने केलं नको ते कृत्य!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *