Bhaskar Jadhav on Atul Bhatkhalkar : विधीमंडळ अधिवेशनात विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अरे तुम्ही काय केलं ते राज ठाकरेंनी सांगितलं होतं. राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, असे म्हणत भास्कर जाधवांनी अतुल भातखळांवर थेट हल्लाबोल चढवला. यामुळं सभागृहात काही काळ वातावरण गरम झआल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहेत, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे. तुमची कुवत आणि झेप देखील लोकांना माहिती आहे असे भास्कर जाधव अतुल भातखळकरांना म्हणाले. मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी तुमची वागण्याची स्टाईल आहे. अरे तुम्ही काय केलं ते राज ठाकरेंनी सांगितलं होतं. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे गेला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. हे राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, असे भास्कर जाधव अतुल भातखळकर यांना उद्देशून म्हणाले. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं नाही, राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं, तुमचं तुम्ही त्यांच्याकडे गेला होता असे जाधव यावेळी म्हणाले.
राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, आदित्य ठाकरेंचांही भातखळकरांना टोला
दरम्यान, आज विधीमंडळात भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील पाऊस आणि नुकसानीसंदर्भातील विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण मंत्री उपस्थित नसल्याचे सांगत भास्कर जाधव विधानसभेत संतापले, हे सरकार बेजबदार आहे, नुसती चर्चा करुन विषय संपवून टाकू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव आणि विरोधकांना टोला लगावला. सरकार बेताल आहे, उद्दाम आहे अशी संसदीय भाषा वापरली जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. राम मंदिर लुटणारे तुम्ही, राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, नीट बोला… नीट बोला… तुमंच वय बघून बोला, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. तेव्हा, तुम्ही खाली बसा ओ असे भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हटले. त्यामुळं सभागृहात काही काळ राजकीय वातावरण गरम असल्याचं पाहायला मिळालं.
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून