‘देऊळ बंद 2’बद्दल नाना पाटेकरांचा फोन आला अन्..; प्रवीण तरडेंनी सांगितला प्रसंग – Marathi News | Nana patekar called pravin tarde after deool band 2 box office success neelkantee patekar took villagers for the show


नाना पाटेकर, प्रवीण तरडे, नीलकांती पाटेकरImage Credit source: Instagram

प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश कमावलं आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर हा दुसरा 100 कोटी रुपयांची कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही या चित्रपटाचं आणि प्रवीण तरडेंचं कौतुक केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांच्याविषयीचा प्रसंग सांगितला. ‘देऊळ बंद 2’ यशस्वी झाल्यानंतर सर्वांत आधी मला नानांनीच फोन केला होता आणि त्यांच्या एका कृतीने मला खूप उभारी मिळाली, असं ते म्हणाले.

काय म्हणाले नाना पाटेकर?

‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “देऊळ बंद 2 यशस्वी झाल्यानंतर मला सर्वांत आधी नाना पाटेकर यांचा फोन आला होता. नीलकांती पाटेकर या त्यांच्या शेतात आणि गावात काम करणाऱ्या 24 ते 26 महिलांना घेऊन थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी स्वत: त्या सर्वांची तिकिटं काढली होती. त्यामुळे मी नाना आणि नीलकांती पाटेकर यांचा खूप आभारी आहे. त्यांचा फोन आल्यानंतर मला खरी उभारी मिळाली.”

मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर आणि इतर कलाकारांच्या दमदार भूमिका असलेला ‘देऊळ बंद 2’ हा आतापर्यंत तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या 39 व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी रुपयांच्या कमाईची मोहोर उमटवली. तर या चित्रपटाचा बजेट फक्त दहा कोटी रुपये इतका आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे. तर दिग्गज अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *