अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार


Saamana Editorial on Ram Mandir: राममंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवर, दागिने, चांदीवर राजरोस डल्ला मारण्यात आल्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. राम मंदिरात लूट होऊनही सकल हिंदू समाज आता आवाज का उठवत नाही? असा सवाल करण्यात आला आहे. 

हा ‘सकल हिंदू समाज’ शांत का बसला आहे?

अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आणि देशभरात ‘सकल हिंदू समाज’ या नावाने अधूनमधून मोर्चे, सभा आणि आंदोलने काढली जातात. हिंदूंच्या नावाने कुठेही छोटीशी घटना घडली, तरी हा समाज “हिंदुत्वाचा अपमान झाला” अशी बोंब मारत रस्त्यावर उतरतो. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, आणि ‘गोहत्या’ हे त्यांचे अत्यंत प्रिय विषय आहेत. एखाद्या जुन्या वास्तूचा किंवा मशिदीचा वाद उकरून काढायचा आणि तिथे तणाव निर्माण करणे हा या लोकांचा छंद आहे. परंतु, आता अयोध्येच्या भव्य राममंदिरातील देणग्या, दानपात्र आणि चांदीच्या वस्तूंची सरळ ‘लूट’ झाल्याचे समोर आले आहे. असे असूनही हा ‘सकल हिंदू समाज’ शांत का बसला आहे? अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटले असल्यामुळेच या समाजाने स्वतःचे तोंड आणि डोळे बंद करून घेतले आहेत का? असा रोकडा सवाल शिवसेनेने (UBT) उपस्थित केला आहे.

आरोपींच्या नावांवरून उपरोधिक टोला

या चोरी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने टिन्नू यादव आणि अनुकल्प मिश्रा नामक काही किरकोळ लोकांना अटक केली आहे. यावरून अग्रलेखात अत्यंत उपरोधिक भाषेत म्हटले आहे की, “आता हे टिन्नू, मिश्रा वगैरे लोक हिंदू नसून मुसलमान आहेत आणि त्यांनी हिंदूंची खोटी नावे धारण करून मंदिरांची लूट केली, अशी अफवा तरी कोणीतरी पसरवून राममंदिर बचाव लढाईला तोंड फोडले पाहिजे. कारण जोपर्यंत राममंदिर लुटीत किंवा कोणत्याही घोटाळ्यात एखादे मुसलमान नाव समोर येत नाही, तोपर्यंत फडणवीस, मिंधे (एकनाथ शिंदे), मोदी, शहा आणि त्यांनी निर्माण केलेला ‘सकल हिंदू समाज’ हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवणार नाही.”

कारण गुन्हा करणारे त्यांचेच ‘हिंदू पाठीराखे’ आहेत

राममंदिर हा भारतीय जनतेचा आत्मा आहे आणि याच मंदिराने देशात हिंदुत्वाला जाग आणली. त्यामुळे मंदिराची ही लूट संपूर्ण हिंदू समाजाच्या आंदोलनाचा विषय ठरायला हवा होता, पण राजकीय फायद्याचे नसल्याने यावर कोणी बोलत नाही, अशी टीका यात आहे. हिंदू समाज केवळ धार्मिक वादांमुळेच धोक्यात येतो का, असा प्रश्न विचारत अग्रलेखात देशातील ‘नीट’ पेपरफुटीच्या घोटाळ्याचा सविस्तर दाखला दिला आहे. महाराष्ट्र हे या पेपरफुटीचे मुख्य केंद्र बनले असून यात आठ-दहा जणांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे, तेजस शाह, मनीषा हवालदार, शिवराज लोखंडे, शुभम खैरनार आणि लातूरचे कोचिंग क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांचा समावेश आहे. हे सर्व पकडले गेलेले लोक ‘हिंदू’ आहेत आणि प्रखर हिंदुत्ववादी भाजपशी संबंधित आहेत. त्यांनी लाखो हिंदू विद्यार्थ्यांचे भविष्य पैशांसाठी अंधारात ढकलले, त्यांचे कोट्यवधी रुपये लुटले. या गुन्हेगारांनी हिंदू मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, तरीही ‘सकल हिंदू समाज’ किंवा भाजपचे नेते यावर गप्प आहेत; कारण गुन्हा करणारे त्यांचेच ‘हिंदू पाठीराखे’ आहेत, असा हल्लाबोल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *