झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?Image Credit source: BCCI
श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या टी20 संघाची धुरा हाती घेतल्यापासून नशिबाने चांगली साथ दिली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी वगळता आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. पण नाणेफेक जिंकून आणि मनासारखा निर्णय घेऊनही विजय काही मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी त्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आतापर्यंत टीम इंडिया 7 टी20 सामने खेळली. यापैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा झिम्बाब्वे दौऱ्यात कस लागणार आहे. कारण या मालिकेत नेतृत्व सिद्ध करण्यात अपयश आलं तर मात्र कठीण होईल. कारण यापूर्वी दुबळ्या समजल्या जाणाऱ्या आयर्लंड संघाने 0-2 ने मात दिली. तर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-4 ने पराभव सहन करावा लागला. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील कामगिरीवर लक्ष आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल की नाही?
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वगळल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने खेळाडूंची आकलनही करता आलं नाही. असं असताना दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला बसवून वैभवला संधी दिली गेली. पण खास करू शकला नाही. तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यातही तीच गत होती. त्यामुळे पाचव्या सामन्यात त्याला बसवण्याचा निर्णय घेतला. आता झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही? हा प्रश्न आहे. पण या मालिकेतून संजू सॅमसनला वगळलं असल्याने त्याचा विचार होईल. त्यामुळे एका अर्थाने श्रेयस अय्यरची डोकेदुखी कमी झाली आहे.
गोलंदाजांची निवड कशी करणार?
गोलंदाजी विभागात श्रेयस अय्यरला हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे विभागात काही बदल पाहायला मिळू शकतात.अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना या मालिकेतून वगळलं आहे. आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलेला लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सचा अशोक शर्मा आणि लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव या दोन वेगवान गोलंदाजांपैकी एकाचा विचार होऊ शकतो. कारण दोघंही 150 किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकण्यास सक्षम आहेत.
काय म्हणाला अशोक शर्मा?
अशोक शर्मा झिम्बाब्वे मालिकेपूर्वी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. अशोक शर्मा म्हणाला की,’भारताची जर्सी परिधान करणे हे माझे पहिले लक्ष्य असेल. ती जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या त्या क्षणाची मी वाट पाहत आहे. मी यासाठी खूप काळापासून वाट पाहत आहे. त्यामुळे ही पहिली गोष्ट असेल. दुसरी गोष्ट म्हणजे, मला जे सर्वोत्तम जमतं ते मी करत राहीन. मी आतापर्यंत जे काही केलं आहे, देशांतर्गत क्रिकेटमधील कठोर परिश्रम, तयारी, दिनचर्या, मी तेच पुढेही चालू ठेवेन.”
भारताची संभाव्य प्लेइंग 11
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा (उपकर्णधार), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे/अशोक शर्मा, हर्ष दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, मयंक यादव.