Sachin Ahir : पक्षाने सगळी पदं दिली, मग ठाकरेंची साथ का सोडली? सचिन अहिर यांची कन्या किरण अहिर शाह यांचं थेट प्रत्युत्तर


मुंबई : लोकसभेतील सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा राजकीय धक्का बसला, तो म्हणजे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या बंडखोरीने. सचिन अहिर यांनी आमदारकीचा राजीनामा देत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला. या पक्षबदलानंतर त्यांना महायुती सरकारकडून विधान परिषदेचे उपसभापतीपदही (Deputy Chairperson of Legislative Council) बहाल करण्यात आलं.

परंतु, ‘ठाकरे पक्षाने सर्व काही दिलेलं असतानाही सचिन अहिर यांनी ऐनवेळी गद्दारी केली आणि साथ सोडली’ अशी चौफेर आणि तिखट टीका ठाकरे गटाकडून सातत्याने केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याविरुद्ध प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळाली. आता या सर्व आरोपांवर आणि टीकेवर सचिन अहिर यांची कन्या किरण अहिर शाह (Kiran Ahir Shah) यांनी मैदानात उतरत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Kiran Ahir Shah Post : मी सचिन अहिर यांची कन्या म्हणून बोलत आहे…

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वडिलांवर होणाऱ्या चिखलफेकीवर किरण अहिर यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे. किरण अहिर म्हणाल्या की, “गेल्या काही दिवसांत मी सोशल मीडियावर माझ्या वडिलांबद्दल असंख्य आरोप आणि द्वेषाने भरलेले मेसेज पाहिले आहेत. आज मी इथे कोणाशी वाद घालायला किंवा कोणाविरुद्ध बोलायला आलेली नाही. मी केवळ एक मुलगी म्हणून, लहानपणापासून मी ज्या माणसाला जवळून ओळखते, त्याबद्दल माझा दृष्टिकोन मांडण्यासाठी आले आहे.”

Kiran Ahir On Aaditya Thackeray : पक्ष का बदलला?

सचिन अहिर यांच्यावर होणाऱ्या सर्वात मोठ्या आरोपाचा उल्लेख करत किरण यांनी लिहिले, “माझ्यासमोर वारंवार एकच प्रश्न उपस्थित केला गेला, तो म्हणजे जर त्यांना आधीच पक्षाने सर्व काही दिले होते, तर त्यांनी पक्ष का बदलला? याचे उत्तर देण्यापूर्वी आपण राजकारणाचा खरा उद्देश समजून घेतला पाहिजे. राजकारणाचा खरा उद्देश केवळ एखादे पद किंवा पदवी उपभोगणे नसून लोकांची सेवा करणे हा असतो. अनेकजण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले, मी त्याचा पूर्ण आदर करते. पण मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसतील, जर त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणाने, निष्ठेने आणि समर्पणाने काम केले नसते, तर त्यांच्यावर इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या असत्या का? पदे कधीही उपकार म्हणून मिळत नाहीत. ती कठोर परिश्रम, क्षमता, नेतृत्व आणि विश्वासाच्या जोरावर मिळवावी लागतात.”

Worli Election 2019 : 2019 मध्ये आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडला

किरण अहिर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत ठाकरे गटाला टोला लगावला. त्यांनी लिहिले, “2019 मध्ये माझे वडील सचिन अहिर यांनी वरळी (Worli Constituency) मतदारसंघातील स्वतःच्या राजकीय दाव्याचा त्याग केला आणि आदित्य ठाकरे यांच्या विजयासाठी संपूर्ण निष्ठेने काम केले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, केवळ जबाबदारी मिळणे म्हणजे सर्व काही नसते. काही वेळा लोककल्याणकारी उपक्रम, विकासकामांचे निर्णय आणि महत्त्वाचे प्रश्न अपेक्षेप्रमाणे पुढे सरकत नसल्याची भावना निर्माण होते. अशा वेळी प्रथम संघटनेत अंतर्गत आवाज उठवला जातो. पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नानंतरही जर लोकांना हवी तशी सेवा करता येत नसेल, तर माणसाला एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. त्यांनी पदाला चिकटून राहावे की लोकांची अधिक प्रभावीपणे सेवा करता येईल असा मार्ग निवडावा? माझ्या मते, वडिलांचा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हता. शेवटी राजकीय पक्ष हे केवळ एक माध्यम आहे, अंतिम ध्येय हे जनता आणि लोकसेवा हेच असायला हवे.”

Kiran Ahir Shah Instagram Post : एक मुलगी म्हणून वडिलांचा सार्थ अभिमान

पत्राच्या शेवटी भावुक होत किरण अहिर यांनी वडिलांच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला. “माझ्या वडिलांसाठी राजकारण म्हणजे निवडणुका जिंकणे किंवा पद सांभाळणे नव्हते, तर लोकांमध्ये राहणे होते. कुटुंबाचे क्षण आणि वैयक्तिक वचनबद्धता बाजूला ठेवून ते मदतीसाठी धावून गेले आहेत. आमच्या घरात लोक कधीही न सांगता हक्काने येतात, कारण त्यांचा सचिन अहिर यांच्यावर विश्वास आहे. वैद्यकीय उपचार, शिक्षण, रोजगार अशा अनेक बाबतीत त्यांनी लोकांना मदत केली आहे. एका निर्णयावरून त्यांचा न्याय करण्यापूर्वी त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कामाकडे पाहा. सुज्ञ नागरिकांना आणि मतदारांना त्यांची खरी ओळख कोणत्याही राजकीय पक्षावरून नाही, तर त्यांच्या हेतूवरून आणि लोकांसाठी असलेल्या वचनबद्धतेवरून कळेल,” असे म्हणत किरण अहिर यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.

ही बातमी वाचा :





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *