Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’, सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!


मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर प्रचंड वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारी राज्यातील अनेक भागात अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या हवामानाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Weather Report) पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

Raigad School Closed : 6 जुलै रोजी शाळा-अंगणवाड्या बंद

रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये 6 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना पूर्ण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हे आपत्कालीन आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी देखील अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने रायगडमध्ये पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगितलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचू शकते.

Palghar Rain Update : शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे आदेश

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) कामात मदत करावी लागणार आहे.

दुसरीकडे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरातही सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने सर्व आपत्कालीन पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *