राम मंदिराच्या दान पेटीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रमुख नेत्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत मंदिराच्या दानाची चोरी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
आता हिंदू माफ करणार नाही
उद्धव ठाकरे यांनी आंदोलनावेळी म्हटले की, आपण कट्टर कडवट हिंदू आहोत, आम्ही हिंदू भोळे भाबडे आहोत, पण मूर्ख नाहीत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललो आहे की अब हिंदू माफ नही करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या. तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं, मला नाही वाटत तितकं काम दुसरं कुणी केलं असेल.
अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘शीलापूजन असेल तर शीलापूजन केलं, रथयात्रा असेल तर त्यात सहभाग घेतला. कारसेवा असेल तर अयोध्येत जाऊन कारसेवा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा फक्त एकच मर्द हिंदूंसाठी उभा राहिला होता, तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
नको ती लोकं सत्ता भोगत आहेत
उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. त्यावेळी हा शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला, नको ती लोकं सत्ता भोगत आहेत आणि हिंदू आजही भरडला जात आहे. 12 वर्षे झाली, आपण ज्यासाठी मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली. मात्र यानंतर शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी अफजलखानी विडा उचलला. त्यांना हिंदूत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. मात्र एकच शिवसेना अशी आहे की समोर उभ राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकते.’